Breaking News

पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांचा इस्त्रायल अभ्यास दौरा


मुंबई : मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर उपाय योजनेसाठी पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ दि. ९ जून ते १३ जून या कालावधीत इस्त्रायलच्या अभ्यास दौऱ्यावर जात आहे.
या शिष्टमंडळात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव श्याम लाल गोयल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव पी. वेलारासू, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे सचिव डॉ. सुरेश कुलकर्णी,भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक शेखर गायकवाड, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता (मु.) सुभाष भुजबळ, मंत्री महोदयांचे खासगी सचिव बप्पासाहेब थोरात, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता (जालना) अजय सिंह यांचा समावेश आहे.

मराठवाडा महसूल विभागातील दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी उपाययोजना करण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. मध्यपूर्वेतील इस्त्रायल या देशामध्ये वाळवंटी परिस्थिती असूनसुद्धा जलसंधारण,पाण्याचा पुनर्वापर, पुनर्चक्रिकरण इत्यादी क्षेत्रामध्ये उच्च दर्जाची कामे करण्यात आली असून, पाणी वापराची अत्युच्च कार्यक्षमता साध्य करण्यात आली आहे. इस्त्रायलच्या या अनुभवाचा मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी उपयोग करण्याचे राज्य शासनाने निश्चित केले आहे. यासाठी इस्त्रायल शासनाच्या मालकीच्या मे. मेकोरोट कंपनीसोबत करार करण्यात आला आहे. मराठवाड्यातील प्रस्तावित उपाय योजनेचे स्वरुप निश्चित करण्यासाठी पुढील दोन वर्षात विविध प्रकारचे अहवाल तयार करण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने इस्त्रायलमध्ये प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी हे शिष्टमंडळ जाणार आहे.