Breaking News

भिडे गुरुजींच्या सभेला भारिपचा तीव्र विरोध जातीयद्वेष पसरवित असल्याने परवानगी नाकारण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- मनोहर उर्फ संभाजी भिडे गुरुजी यांची रविवारी शहरात होत असलेल्या सभेला भारिप बहुजन महासंघाच्या वतीने तीव्र विरोध दर्शविण्यात आला आहे. ते जातीयद्वेष पसरवित असल्याचा आरोप करीत त्यांच्या सभेला परवानगी न देण्यासाठी मार्केटयार्ड चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली.
यावेळी भारिपचे ज्येष्ठ नेते सुनिल शिंदे, विनोद गायकवाड, योगेश साठे, रवींद्र वाघमारे, संग्राम भगत, विजय मिसाळ, महेंद्र भांबळ, राजेंद्र काळे, सागर साबळे, देविदास भालेराव, गणेश अडसूळ, अजय बोरुडे, दिलीप साळवे, सागर ठोकळ, सचिन बडेकर, सचिन साळवे, सिद्धार्थ घोडके, अक्षय पवार, गौरव पंडित, प्रशांत भिंगारदिवे, मोहसीन सय्यद आदि उपस्थित होते.
रविवार दि.10 जून रोजी शहरातील पटेल मंगल कार्यालयात मनोहर उर्फ संभाजी भिडे गुरुजी यांच्या सभेचे नियोजन करण्यात आले आहे. या सभेत जातीय तेढ निर्माण होण्याच्या उद्देशाने ते गरळ ओकणार असून, त्यांच्या सभेला प्रशासनाने परवानगी देवू नये. तर धर्मनिरपेक्षता हा निव्वळ थोटांट, सर्व धर्म समभाव हा नालायकपणा तर हिरव्या रंगावर कधीच विश्‍वास बसू शकत नसल्याचे संविधानाविरोधी वक्तव्य करणार्‍या भिडे गुरुजींवर देशद्रोहाचा खटला भरण्याची मागणी भारिपच्या वतीने करण्यात आली आहे. सदर मागणीचे निवेदन कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यांना देण्यात आले.