Breaking News

दुर्मिळ ’नवरंग’ पक्ष्याचे माकुणसार येथे दर्शन


पावसाळा येऊ घातल्याची वर्दी देणार्‍या पक्ष्यांमधला हा एक देखणा पक्षी ’इंडियन पिट्टा’ अर्थात ’नवरंग’. भारतात स्थानिक स्थलांतर करणारा हा नवरंग मे महिन्याच्या सुमारास महाराष्ट्राला भेट देतो. असा हा दुर्मिळ नवरंग पालघर तालुक्यातील माकुणसार येथे आढळून आला. सह्याद्री मित्र संस्थेचे सदस्य तसेच पक्षीनिरिक्षक निकेत पाटील यांना त्यांच्या घराजवळील बागेत हा पक्षी दिसताच त्यांनी त्याची छबी कॅमे-यात टिपली. ’नवरंग’ या नावाप्रमाणे नितांत सुंदर अशा नवरंगाचे दर्शन याची देही याची डोळा झाले आणि डोळ्यांचे पारणे फिटले, असा आनंद पक्षीनिरीक्षक निकेत पाटील यांनी व्यक्त केला.
हा अतिशय लाजाळू पक्षी असून तो बहुतांशी दाट झुडुपी जंगलात आढळतो. त्याचे या परिसरात दिसणे हे समृद्ध जैवविविधतेचे लक्षण आहे. पालघर जिल्ह्यात तो आढळल्यामुळे परिसरातील निसर्गप्रेमींमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. पालघर जिल्ह्याला जैवविविधतेचे वरदान आहे. जंगल, पठारी प्रदेश, समुद्र किनारा, खाडी अशा प्रकारची नैसर्गिक विविधता लाभल्यामुळे येथे कायम देशी - विदेशी पक्षांचा वावर आहे. हा ठेवा जपणे आणि त्याचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी असल्याचे पक्षीनिरीक्षक निकेत पाटील यांनी म्हटले.