Breaking News

मान्सूनचा पाऊस महाराष्ट्रात दाखल

मुंबई : पावसाची ही प्रतिक्षा संपली असून नैऋत्य मोसमी मान्सूनचा पाऊस शुक्रवारी महाराष्ट्रात दाखल झाला आहे. येत्या 24 तासात मान्सून मुंबईत धडकणार आहे. तळ कोकणात मान्सूनच्या पावसाचे आगमन झाल्याचे शुक्रवारी सकाळी भारतीय हवामान विभागाने जाहीर केले. मागच्या दोन दिवसांपासून मुंबईसह राज्याच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत आहेत. मान्सून पूर्व पावसाच्या सरींनी प्रशासनाची तयारी उघडी पाडली आहे. काल सखल भागात पाणी साचले होते तसेच लोकल वाहतूक विस्कळीत झाली होती. जून महिन्यात ही स्थिती असेल तर जुलै, ऑगस्टमध्ये काय होईल ? असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडला आहे. मुंबई सध्या मेट्रो प्रकल्प आणि अन्य कामांसाठी मोठया प्रमाणावर खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचण्याची भिती आहे. मागच्या 24 तासा उमगरगाव, नंदूरबार 208 मिमी, निलंगा लातूर 129 मिमी, शिरुर 105 मिमी, रत्नागिरी 63 मिमी, मुंबईत 74 मिमी, नांदेड 80 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

हवामान खात्याने पुढील सहा दिवस महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 7 जून रोजी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिह्यात बहुतेक सर्व ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता होती. शुक्रवार, 8 जून रोजी सिंधुदुर्ग व रत्नागिरी, रायगड जिह्यात अतिवृष्टीची शक्यता असून, वर्तविण्यात आली आहे. शनिवार, 9 जून रोजी सिंधुदुर्ग व रत्नागिरी, मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिह्यात बहुतेक सर्व ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. 10 व 11 जून रोजी मुंबईसह कोकणात सर्व ठिकाणी मुसळधार पाऊस व काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज आहे. हवामान खात्याच्या इशा़र्‍यानंतर प्रशासनास दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन राज्य आपत्ती निवारण कक्षाने केले आहे.