Breaking News

पादचार्‍यांसाठी उड्डाणपुलावर पदपथ ठेवा - प्रल्हाद म्हात्रे


डोंबिवली - ठाकुर्ली येथील रेल्वे फाटक बंद करणे, पूर्व-पश्‍चिम शहरांना जोडणे आणि वाहतूक कोंडी मुक्त अशा मुलभूत गरजा म्हणून पूर्वेकडील जोशी हायस्कूल येथे उड्डाणपुलाची निर्मिती झाली. पण या बरोबर पादचार्‍यांची व्यवस्था होणे क्रमप्राप्त होते. पण महापालिका प्रशासनाने उड्डाणपुलाच्या आराखड्यात याचा विचार केला नाही. यामुळे मनसेचे परिवहन समिती सदस्य तथा शहर संघटक प्रल्हाद म्हात्रे यांनी पादचार्‍यांसाठी उड्डाणपुलावर पदपथाच्या व्यवस्थेची मागणी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
शहरात दोन उड्डाणपूल उभारण्यात आले असून एक जुना मुंबई दिशेने कोपरब्रीज आणि दुसरा नवीन ठाकुर्ली दिशेने जोशी हायस्कूलजवळ आहे. कोपरब्रीज उड्डाणपूलाच्या दोन्ही बाजूस पादचार्‍यांना ये-जा करण्यासाठी पदपथ आहेत. परिणामी या पुलावर कोणत्याही प्रकारचा धोका पादचार्‍यांना होऊ शकत नाही. मात्र जोशी हायस्कूलजवळ नव्याने निर्मिती झालेल्या उड्डाणपुलावर पदपथाचा विचारच करण्यात आला नाही कि काय अशा प्रश्‍न अनुत्तरीत आहे. या विभागत प्रख्यात ग्रामदैवत गणपती मंदिर असल्याने या पुलावरून गणेशनगर, 52 चाळ, राजुनगर तसेच पूर्वेकडील पेंडसेनगर, सारस्वत कॉलनी, फडकेरोड यामार्गे हजारोंच्या संख्येने पादचारी जोशी हायस्कूल उड्डाणपुलाचा वापर करणार आहेत.
डोंबिवली पश्‍चिमेतील अनेक नागरिक एमआयडीसी विभागात नोकरीला आहेत. तसेच पश्‍चिमेतील अनेक विद्यार्थी ठाकुर्ली पूर्वेतील स.वा. जोशी विद्यालय, महिला समिती शाळा, खंबाळपाडा येथील मंजुनाथ कॉलेज, एमआयडीसी विभागातील पेंढारकर आणि मॉडेल कॉलेज आदी ठिकाणी शिक्षणासाठी जात असतात. मुळात हा उड्डाणपूल अरुंद असून नागमोडी वळणदार असल्याने अपघात होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर आहे. अद्याप या उड्डाणपुलाचे लोकार्पण झाले नाही तरीही पुलावर वाहनाची वर्दळ सुरु झाली आहे. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे दोन दिवसांपूर्वी चारचाकी टेम्पोचा अपघात झाला. पण दैव बलवत्तर म्हणून कठड्यावर आदळूनही मनुष्यहानी झाली नाही. नाहीतर टेम्पो चक्क रेल्वेरुळावरच पडला असता. पदपथच नसल्याने नागरिकांची तारांबळ उडत आहे. त्यामुळे या पुलाच्या दोन्ही बाजूला पदपथ बांधण्यात यावे जेणे करून पादचारी या पुलावरुन चालू शकतील. या आशयाचे लेखी निवेदन मनसेचे परिवहन समिती सदस्य व शहर संघटक प्रल्हाद म्हात्रे यांनी आयुक्त व महापौरांना देऊन पुलावर पदपथाची मागणी केली आहे.
सुमारे 25 कोटी रुपये खर्च करून जोशी शाळेजवळ रेल्वे उड्डाणपूल बांधला आहे. या पुलामुळे रेल्वेचे फाटक बंद होवून जो वाहतुकीचा खोळंबा होतो ती समस्या दूर होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर उड्डाणपुलामुळे ठाकुर्ली स्टेशन परिसरात होणारा वाहतुकीची कोंडी दूर होण्यास देखील मदत होणार आहे. या गंभीर बाबींचा विचार करून याठिकाणी तात्काळ उपाय योजना करावी अशी विनंती ही म्हात्रे यांनी लेखी निवेदनात केली आहे.