Breaking News

भाजपा सरकारने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले ः आ. वैभव पिचड


अकोले / प्रतिनिधी । 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थापनेनंतर 15 वर्षे सत्तेत असताना राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी शेतकर्‍यांना सदैव साथ देऊन शेतमाल निर्यात करणारा देश बनविला होता. मात्र गेल्या 3-4 वर्षांपासून सत्तेत आलेल्या या भाजपा सरकारने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले असुन, शेतकरीविरोधी या सरकारला 2019 मध्ये सत्तेतुन घालविण्याचा संकल्प आज सर्व कार्यकर्त्यांनी करुन त्या दृष्टीने कामास लागण्याचे आवाहन आ. वैभव पिचड यांनी केले. 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 20 व्या वर्धापन दिनानिमित्त अकोलेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी आ. पिचड कार्यकर्त्यांना संबोधित करताना बोलत होते. सकाळी 10 वाजून 10 मिनिटांनी ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी आ. वैभव पिचड, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, ज्येष्ठ नेते मधुकर नवले, मिनानाथ पांडे, पक्षाचे सेक्रेटरी यशवंत आभाळे, नगराध्यक्षा संगिता शेटे, तालुका महिलाध्यक्षा चंद्रकला धुमाळ, युवक अध्यक्ष शंभू नेहे प्रमुख उपस्थित होते. यावेळी राष्ट्रगीत गावून ध्वजाला सलामी देण्यात आली.
यावेळी बोलताना आ. पिचड म्हणाले की, 10 जुन 1999 रोजी देशाचे नेते शरद पवार यांनी शिवाजी पार्क येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. यानंतर पक्ष केंद्र व राज्यात 15 वर्षे सत्तेत होता. शरद पवार हे कृषीमंत्री असताना शेतकर्‍यांसाठी अनेक योजना राबविल्या त्यात शेततळे, फळबाग अशा अनेक योजना होत्या. शेतकर्‍यांवर आपत्ती असल्यास वेळोवेळी अनुदान दिले, सरसकट कर्जमाफी दिली. त्याचबरोबर गोरगरीब, नोकरदारासांठी व पगारदार यासाठी वेतन आयोग लागू केले, यासह अनेक योजना सर्वसामान्यांचे हिताच्या सुरु केल्या.तत्कालीन उपमुख्यमंत्री व पक्षाचे नेते अजित पवार मंत्री असताना न भुतो न भविष्य असे सिंचनाचे मोठे काम राज्यात झाले. अनेक धरणांची कामे या काळात झाल्याने राज्यात सिंचन वाढले मात्र दादांना व पक्षास बदनाम करण्यासाठी त्यांच्यावर खोटे व बिनबुडाचे आरोप केले, त्यातही काही तथ्य नसल्याचे आत उघड झाले आहे.
गेल्या तीन वर्षांपासून राष्ट्रवादी पक्षाने सत्तेत नसतानाही शेतकरी व कष्टकरी यांच्याशी बांधिलकी असल्याने रस्त्यावर उतरून या सरकार विरोधात आंदोलन केलीत. या सरकारविरोधात राज्यभर हल्लाबोल आंदोलन केले. राज्यात शेतकरी संप व आंदोलन करत आहे, तर या सरकारचे मंत्री शेतकरी चेष्टा करत आहे. प्रसिद्धीसाठी करत आहे, असे बेताल वक्तव्य करुन शेतकर्‍यांची चेष्टा करत आहे. आपल्या देशाच्या सीमेवर रोज जवान शहीद होत आहे. आपल्या शेजारील शत्रू राष्ट्र पाकिस्तान रोज सीमेवर गोळीबार करत असताना, त्या राष्ट्राची आर्थिक परिस्थिती मजबुत करण्यासाठी या सरकारने पाकिस्तानकडुन साखर आयात करुन आपल्या जवानांचा व देशाचा अपमान केला आहे. त्यामुळे या सरकारच्या काळात जय जवान व जय किसानची अवहेलना चालु आहे. त्यामुळे आता येत्या 2019 च्या निवडणुकीत या शेतकरी, कष्टकर्‍यांच्या विरोधातील या सरकारला घालविण्यासाठी आज पक्षाचे स्थापनादिनी संकल्प करुन, सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामास लागुन समाजात जनजागृती करण्याची सूचना आ. वैभव पिचड यांनी केली. यावेळी तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव, ज्येष्ठ नेते सीताराम गायकर, मधुकर नवले, मिनानाथ पांडे यांनीही मनोगत व्यक्त केली.
यावेळी राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस राहुल देशमुख, विजय पवार, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश नाईकवाडी, युवक नेते विक्रमनवले, नगरसेवक सचिन शेटे, नामदेव पिचड, परशुराम शेळके, सुरेश लोखंडे, नगरसेविका स्वाती शेणकर, सुभद्रा नाईकवाडी, अ.सा.का. संचालक सुरेश गडाख, सुनिल दातीर, राजेंद्र डावरे, जनलक्ष्मीचे चेअरमन भाऊ नवले, प्रा. संपत नाईकवाडी, दुध संघाचे संचालक गोरख मालुंजकर, बाळा नवले, विकास शेटे, प्रकाश साळवे, प्रा. भूषण जाधव, राहुल बेनके, कुमुदिनी पोखरकर, कविराज भांगरे, विजय लहामगे, शशिकांत देशमुख, प्रवीण वाकचौरे, गोरख वाकचौरे यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.