Breaking News

प्रहार जनशक्तीच्यावतीने निदर्शने



शेती माल व साखरेची आयात थांबवून, शेतमालाला हमी भाव देत शेतकर्यांना कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष प्रकाश पोटे, विजय म्हस्के, अजय सोलंकी, अमोल गायकवाड, धनंजय गायकवाड, मंगलाताई मोरे, शहाजी शेंडगे, वजीर सय्यद, अमोल कातोरे, ऋषीकेश पवार आदि सहभागी झाले होते. 
 
शेतकर्यांची कर्जमाफी व शेतमालाला हमीभाव न देता सरकारने पाकिस्तानची साखर तर मोझांबीकची तूर आयात केली आहे. सरकारचा हा निर्णय शेतकर्यांना आत्महत्येला प्रवृत्त करणारा आहे. महाराष्ट्रात तुरीचे विक्रमी उत्पादन होऊन त्याला हमीभाव देता आलेला नाही. राज्यात ऊस उत्पादक शेतकर्यांना योग्य भाव उपलब्ध करुन न देता आपल्या निष्पाप सैनिकांना मारणार्या व दहशत पसरविणार्या पाकिस्तानची साखर आयात करुन शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या भावनांची विटंबना करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांच्या वतीने करण्यात आला आहे.
दूधाच्या भावासाठी चालू असलेल्या शेतकर्यांच्या आंदोलनाकडे सत्ताधारे दुर्लक्ष करीत असून, आंध्र, गुजरातचे भेसळयुक्त दूध महाराष्ट्रात आनले जात आहे. यामुळे शेतकर्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक बनली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी विरोधी धोरणात बदल करुन, शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांना देण्यात आले. या मागण्या मान्य न झाल्यास प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आ.बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली राज्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.