Breaking News

सावेडी प्रभाग कार्यालयाची जिल्हाधिकार्‍यांनी घेतली झाडाझडती

मनपाच्या सावेडी प्रभागात आज प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी अचानकपणे भेट दिल्याने कर्मचार्‍यांची एकच धांदल उडाली. प्रभागात वसुली होत नाही, आयकार्ड सर्वांकडे नाही, तसेच मस्टर तपासणी करून त्यांनी कर्मचार्‍यांची चांगलीच झाडाझडती घेतली. एका कर्मचार्‍याला निलंबनाचे आदेश दिले असून दोन जणांची बिनपगारी करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले. जर मुदतीत वसुली झाली नाही तर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.यावेळी मनपाचे प्रभारी उपायुक्त बी. एस. तडवी, महसूल विभागाचे कापडनीस आदी यावेळी उपस्थित होते.

सिना नदीपात्रातील पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी व्दिवेदी यांनी थेट सावेडी प्रभाग कार्यालयाला भेट देण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी प्रभाग अधिकारी नसल्यामुळे सुरूवातीला त्यांची चौकशी केली तसेच तात्काळ मस्टर माझ्यासमोर ठेवा अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. आयुक्त येताच अनेकांची धांदल उडाली. जे कर्मचारी बाहेर होते. त्यांना तात्काळ कार्यालयात बोलावून घेतले. तसेच सर्वांनी ओळखपत्र लावले होते. आयुक्तांनी प्रत्येकाची स्वतंत्र अशी ओळख तसेच कामाचे स्वरूप जाणून घेतले. दोन जण न सांगता गेल्यामुळे त्यांचे बिनपगारी करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. तर एका जणाकडे ओळखपत्र आढळून आले नाही त्याच्याकडे दुसर्‍याचे ओळखपत्र आढळून आल्यामुळे त्याच्यावर निलंबनाची कारवाई करा असे आदेश त्यांनी दिले आहे.