Breaking News

संवत्सरचे शेतकरी गटाची वाटचाल अनुकरणीय : जैन


कोेपरगांव : तालुक्यातील संवत्सर येथील पंचअवतार शेतकरी गटाने आतापर्यंत ३० लाख रूपयांची बचत करून १ कोटी रूपयांच्यावर उलाढाल केली आहे. शेतकरी आत्महत्यांच्या घटना घडत असताना या शेतकऱ्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे. अन्य गावातील शेतक-यांनीही याचे अनुकरण करावे, असे प्रतिपादन भारतीय स्टेट बॅंकेचे जिल्हा मुख्य व्यवस्थापक राजेंद्र जैन यांनी केले.
शासनाने शेतक-यांना दिलेली कर्जमाफी ऐतिहासिक असून अजूनही काही शेतकरी यात वंचित असतील त्यांनी दि. ३० जुनपर्यंत फाॅर्म भरावेत. शासनाच्या ओटीएस योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. प्रारंभी भारतीय स्टेट बॅंक कोपरगांव शाखेचे शाखाधिकारी राजेश फुरसुले यांनी शेतक-यांसाठी असणा-या योजना व कर्ज वितरणाबाबत माहिती दिली. पंचअवतार गटाचे सचिव महेश परजणे यांनी प्रास्तविक केले. तालुका कृषी अधिकारी आढाव यांनी शासनाच्या कृषी योजनांची माहिती दिली. 

कृषी सहायक डरांगे (संवत्सर), वसईकर (वारी), सावंत(संवत्सर), स्टेट बॅंक कोपरगांव शाखेचे कृषी विभागाचे अण्णासाहेब भवर यांनी शेतीविषयक माहिती दिली. याप्रसंगी सर्वश्री बापूराव बारहाते, संजय भाकरे, प्रकाश बारहाते, मधुकर साबळे, व्यंकटेश बारहाते, दत्तात्रय शेटे आदी उपस्थित होते. यावेळी पंचअवतार शेतकरी गटाच्यावतीने स्टेट बॅंक अधिका-यांचा सत्कार करण्यात आला.