Breaking News

अग्रलेख - कर्नाटकचा कौल ?

कर्नाटक निवडणूक भाजपाने गुजरातसारखीच प्रतिष्ठेची केली होती. त्यादृष्टीने निकालाला अत्यंत महत्व प्राप्त झाले आहे. मतदान चाचण्यांनी देखील कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहूमत न देता, त्रिशंकु निकाल लागतील असे अदांज वर्तवल्यामुळे सर्वांचे निकालाकडे लक्ष लागले आहे. काँगे्रस आपली सत्ता टिकवितो, की भाजप दक्षिणेत मोठया दिमाखाने प्रवेश करतो, की जेडीयू किंगमेकर ठरतो, अशा अनेक शक्यता यानिमित्ताने समोर येतांना दिसत आहे. मात्र संपूर्ण चित्र स्पष्ट होण्यासाठी काही तासांचा अवधी आता उरला आहे. दक्षिणेत शिरकाव करण्यासाठी भाजपच्या दृष्टीने ही निवडणूक महत्वपूर्ण असून, पंतप्रधान मोदींच्या झंझावती प्रचारसभांमुळे कानडी मुलूख ढवळून निघाला होता. तर दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर राहुल यांच्या नेतृत्वाखाली होणारी पहिलीच निवडणूक आहे. गेल्या तीन महिन्यांत राहुल यांनी कर्नाटक पिंजून काढला. उमेदवारी निश्‍चिती ते प्रचाराची रणनीती ठरविण्यापर्यंत राहुल यांचा सहभाग होता. त्यामुळे पक्षाला विजय मिळाल्यास त्याचे श्रेय राहुल यांच्या खात्यात जमा होईल. मात्र, पराभवाला सामोरे जावे लागल्यास विरोधक राहुल गांधींना लक्ष्य करू शकतात. राहूल गांधी यांनी थेट भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येदियुरप्पा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांना चांगलेच जेरीस आणले होते. तर दुसरीकडे पंतप्रधान मोदी यांनी विकासकामांचा कोणताही दाखला न देता, काँगे्रसवर बेछुट आरोप केले होते. त्यामुळे दोन्हीकडून देखील तितक्याच शक्तीने प्रचार करण्यात आला. आरोप करण्यांची पध्दत पार खालच्या पातळीवर पोहचली होती. वास्तविक पाहता भाजपाकडून सोशल मिडीयाचा वापर मोठया खूबीने करण्यात आला होता, आता मात्र चित्र उलटे असून सोशल मिडीया भाजपसाठी डोकेदुखी ठरत असल्याची चिन्हे कर्नाटक विधानसभा निवडणूकांच्या निमित्ताने दिसून येत आहे. या निवडणूकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण देशांचे प्रधानमंत्री आहोत, याचे भान हरपून आपण कर्नाटकचे मुख्यमंत्री असल्याच्या थाटात संपूर्ण राज्य पिंजून काढत प्रचारदौरा केला. मात्र यावेळी काँगे्रसकडून मिळणारे तितकेच कडवे आव्हान भाजपासमोर प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारी आहे. कर्नाटकात भाजपचा पाडाव झाल्यास पक्षांची सुत्रे ज्या दोन धुरंधराकडे आहे, ती म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्याकडे आहे. त्यामुळे कर्नाटकात झालेला पाडाव हा भाजपचा राहणार नसून तो मोदी आणि शाह या जोडागोळीचा असेल, याची पूर्ण जाणीव या दोघांसह भाजपला आहे. कर्नाटकनंतर मध्यप्रदेश, राजस्थान विधानसभा निवडणूका येऊ घातल्या आहेत. तसेच आगामी लोकसभा निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी एक वर्षभरांचा अवधी उरला आहे. मात्र त्यापूर्वीच सर्वच राजकीय पक्षांची रणनिती लोकसभा निवडणूकांना समोर ठेवून करतांना दिसून येत आहे. त्यामुळे कर्नाटक निवडणूकांचे निकालाचे पडसाद पुढील लोकसभा निवडणूकांच्या दरम्यान दिसतील. त्यामुळे कर्नाटकात जो पक्ष सत्तेवर येईल, त्याच पक्षाचां पंतप्रधान 2019 मध्ये विराजमान होईल, असा राजकीय अंदाज असल्यामुळे, सर्वच पक्षांनी कर्नाटक निवडणूक गांभीर्यांने घेतली आहे.