Breaking News

कॉलर काढायची का विजार ते जनता ठरवेल : ना. रामराजे

सातारा, दि. 15 (प्रतिनिधी) : कुणाची कॉलर वर जाणार, कुणाची खाली जाणार तसेच कुणाचा शर्ट, इजार काढायची हे जनता ठरवेल. खासदार उदयनराजेंनी बोलतो त्याप्रमाणे क रून दाखवावे. त्यांना माझ्या शुभेच्छा राहतील. उमेदवारीचा निर्णय खासदार शरद पवार साहेब कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेऊन घेतील. त्यांच्या निर्णयाची आम्ही सर्वजण वाट पाहात आहोत. निवडणुकीपूर्वी अशा चर्चांना माझ्या दृष्टीने महत्त्व नाही, असा टोला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निबाळकर यांनी खा. उदयनराजे भोसले यांना लगावला.
सातारा येथे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिनिमित्त खा. शरद पवार आले होते. त्या दरम्यान, कॉलर उडविण्याच्या प्रकारणाबाबत पत्रक ारांशी बोलताना खा. पवार यांनीही आपल्या शर्टची कॉलर उडवून काही काळानंतर सर्वांच्या कॉलर सुतासारख्या मऊ होतील, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर खा. उदयनराजे यांनी खा. पवार यांनी आपल्या कॉलर उडविण्याच्या स्टाईलचे अनुकरण केले एवढेच आपल्याला पुरेशे असल्याचे सांगून आपणालाच राष्ट्रवादीकडून लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याचे ठामपणे सांगितले होते. 
ना. रामराजे म्हणाले, सातार्‍यातून कुणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय पवार साहेब घेतील. त्यांच्या विचारांशी आम्ही बांधील आहोत. उमेदवारीचा निर्णय दिल्लीत होत असेल तर त्यांच्याप्रमाणे दिल्लीला आम्हालाही जाता येते. जिल्ह्यात आम्ही नसलो की अनेकांच्या कॉलर उडतात, असे रामराजे म्हणाले. 
अद्याप पवार साहेबांनी उमेदवारी संदर्भात आमच्याशी चर्चा केलेली नाही. कोण म्हणंत असेल आम्हाला उमेदवारी दिली आहे, त्याबाबत साहेबांशी सर्व आमदार बोलतील. वेळ आल्यानंतर योग्य उत्तर देऊ. तसेच या खासदारांची वर्षाची कामगिरी गिनीज बुकात नोंद करण्यासारखी आहे, असा टोला शेवटी लगावला. दरम्यान, पक्षाची उमेदवारी कोणाला हा प्रश्‍न पुन्हा उपस्थित केला असता राष्ट्रवादीतून मानकुमरे इच्छुक आहेत, असे त्यांनी सांगितले.