कारने पेट घेतल्याने शिक्षिकेचा मृत्यू
लातूर - परीक्षा देण्यासाठी लातूरहून संभाजीनगरला निघालेल्या शिक्षिकेचा लातूर-मुरुड रस्त्यावर कारमध्ये जळून मृत्यू झाला. ही घटना आज (बुधवारी) पहाटे घडली. शिक्षक असलेल्या नवर्यानेच तिला कारमध्ये जाळून मारल्याचा आरोप मृत शिक्षिकेच्या भावाने केला आहे. संबंधित शिक्षकास पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. जिल्ह्यातील शिरुर अनंतपाळ तालुक्यातील मौजे शिवपूरच्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून मिनाकुमारी व्यंकटराव सूर्यवंशी या कार्यरत होत्या. त्या संभाजीनगर येथे परीक्षा देण्यासाठी लातूर येथून आपल्या पतीसोबत कारने निघाल्या होत्या. कारमध्ये पती-पत्नी दोघेच होते. मुरुड शहरापासून सुमारे पाच किलोमीटर अलिकडे कारला अचानक आग लागली आणि त्यामध्ये मिनाकुमारी भाजल्या. त्यांना लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. मृत शिक्षिकेचा नवरा शिवशंकर तुकाराम बनसोडे यानेच तिला निर्घृणपणे कारमध्ये जाळून मारले आणि कारने अचानक पेट घेतल्याचा बनाव केला असल्याची तक्रार मृत शिक्षिकेचा भाऊ ओमप्रकाश सूर्यवंशी याने पोलिसात केली आहे.
