Breaking News

एसटी उपरस्त्याऐवजी पुलावरून नेली; चौघे निलंबित


सोलापूर, दि. 14, मे - सोलापूरहून पुण्याला जाताना उपरस्त्यावरून न जाता थेट उड्डाण पुलावरून एसटी नेण्याचा प्रकार चार कर्मचार्‍यांना चांगलाच महागात पडला. या संदर्भात प्रवाशांची तक्रार आल्यानंतर चौघांना विभाग नियंत्रकांनी निलंबित केले. अनेकदा प्रवासी नसल्याने एसटी रिकाम्याच धावतात. यामुळे एसटी महामंडळाचे आर्थिक नुकसान होते. 

या पार्श्‍वभूमीवर एसटी प्रशासनाने चालक व वाहकांना विविध सूचना दिली जाते. अनेक प्रवासी पुण्याला जाण्यासाठी सोलापूर -पुणे महामार्गावरील सर्व्हिस रोड येथे उभारलेले असतात. यात बहुतांश प्रवासी ग्रामीण भागातील असतात. मात्र काही दिवसापासून एसटी सर्व्हिस रोडवर थांबलेल्या प्रवाशांना न घेता थेट उड्डाणपुलावरून जात होत्या. प्रवाशांकडून सूूचना आल्याने उपरस्त्यावरून जाण्याचा आदेश दिला होता. दोन दिवसांपूर्वी एसटीच्या भरारी पथकाला बार्शी व अक्कलकोट आगारची एक गाडी थेट उड्डाणपुलावरून जाताना आढळली. त्या संबंधित दोन्ही आगाराच्या दोन चालक व दोन वाहकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. विभाग नियंत्रकाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. निलंबित कर्मचार्‍यांची नावे मात्र समजू शकलेली नाहीत.