Breaking News

पश्‍चिम बंगालमध्ये हिंसाचाराचा आगडोंब हिंसाचारात 12 लोकांचा बळी; स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीदरम्यान हिंसाचार

कोलकाता - पश्‍चिम बंगालमधील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या मतदानाला हिंसाचाराचे गालबोट लागले आहे. जलपायगुरु मतदानकेंद्रावरील मतपेटीला आग लावण्यात आली आहे. मतदान सुरु होऊन तीन तासांचा अवधी उलटला नसताना काही मतदान केंद्रावर मतदान करू देण्यास मज्जाव केल्यावरुन राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. आत्तापर्यंत या हिंसाचारात 12 लोकांचा बळी गेला आहे. दक्षिण 24 परगणातील कुलताली येथे तृणमूल काँग्रेसच्या आरिफ गाझी या कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. तर पश्‍चिम बंगालमधील उत्तर 24 परगणातील आमदंगा येथील साधनापूरमध्ये मतदान सुरू असताना केंद्राबाहेर सोमवारी क्रूड बॉम्बचा स्फोट झाला. यात 20 जण जखमी झाले असून 1 जण ठार झाला आहे.

भाननगर याठिकाणी वृत्तवाहिनीच्या वाहनाला लक्ष्य करण्यात आले. सकाळपासून मतदानकेंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. यापूर्वी निवडणूक काळात घडलेल्या हिंसाचाराच्या घटना लक्षात घेता चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कायदा-सुव्यवस्थेची स्थिती अबाधित ठेवण्यासाठी 46000 पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. नामांकन अर्ज दाखल करण्यावेळी तृणमूल काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. त्यात काही कार्यकर्त्यांना आपला जीव देखील गमवावा लागला होता. मुख्यमंत्री ममता बॅमर्जी यांनी 14 तृणमूल कार्यकर्त्यांची तर भाजपने 52 कार्यकर्त्यांची हत्या झाल्याचा दावा केला होता. त्यानंतर लढाई सर्वोच्च न्यायालयात गेली होती. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने कोलकाता उच्च न्यायालयाला निवडणूक सुरळीत पार पाडण्यासंदर्भात आदेश दिले होते. 


क्रूड बॉम्ब स्फोटात 1 ठार 
पश्‍चिम बंगालमधील उत्तर 24 परगणातील आमदंगा येथील साधनापूरमध्ये मतदान सुरू असताना केंद्राबाहेर सोमवारी क्रूड बॉम्बचा स्फोट झाला. यात 20 जण जखमी झाले असून 1 जण ठार झाला आहे. पश्‍चिम बंगालमधील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका आज होत असून मतदानाला हिंसाचाराचे गालबोट लागले आहे. 621 जिल्हा परिषद, 6157 पंचायत समिती आणि 31,827 ग्रामपंचायतींसाठी मतदान होत असून 17 मे’ला मतमोजणी प्रक्रिया पार पडेल.