Breaking News

इतिहास जीवनात नेहमीच मार्गदर्शक : ढोणे


संगमनेर,  महाविद्यालयीन जीवन हे प्रत्येकाच्या आयुष्यातील सुवर्णकाळ आहे. प्रत्येक माणूस गाव, राज्य, देश, समाज यांना इतिहास असतो. हा इतिहास जीवनात यशस्वी होण्यासाठी नेहमीच मार्गदर्शक ठरत असतो, असे प्रतिपादन प्रा. नामदेव ढोणे यांनी केले.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कला, वाणिय व विज्ञान महाविद्यालयातील इतिहास विभागातील अंतिम वर्षाच्या  विद्यार्थ्यांना निरोप समारंभप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. शिवाजी नवले होते. याप्रसंगी प्रा. डॉ. त्र्यंबक राजदेव, अमृत उद्योग समूहाचे जनसंपर्क अधिकारी प्रा. नामदेव कहांडळ, प्रा. दत्तात्रय कांबळे, प्रा. स्नेहल थिटमे, अजित सरोदे आदी उपस्थित होते. गत आठवणींनी अनेकांचे डोळे पानावले.

प्रा. ढोणे म्हणाले, इतिहास नसलेला माणूस हा स्मृतीभंग झालेल्या माणसासारखा असतो. इतिहास विषयाची आवड प्रत्येकाला असते. त्यामध्ये करीअरच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. ग्रामीण विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील न्यूनगंड दूर करुन स्पर्धा परिक्षांना सामोरे गेले पाहिजे. संधी खूप आहे. त्यासाठी योग्य पात्रताधारक मिळत नाही. कष्ट करण्याची तयारी असेल तर मोठे यश नक्की मिळवता येईल.

प्रा. शिवाजी नवले म्हणाले, थोरात महाविद्यालयाने सातत्याने गुणवत्ता जपली आहे. अनेक माजी विद्यार्थी विविध पदांवर यशस्वी कार्यरत आहे. विद्यार्थ्यांनी वाचनावर भर दिला पाहिजे. वाचनातून नवी उर्जा तर मिळतेच पण करीअरची संधी ही मिळते. 

प्रा. नामदेव कहांडळ म्हणाले, आ. बाळासाहेब थोरात व आ. डॉ. तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्या शैक्षणिक संस्था गुणवत्तेने पुढे आहे. त्या सुविधांचा लाभ घ्या. इतिहास तुम्हाला जगण्याचे बळ देईल. संस्थेचा , शिक्षकांचा , वडीलधार्‍या माणसांचा आदर बाळगा. नम्रता तुम्हाला जीवनात मोठे यश मिळवून देईल. 

यावेळी ज्योती शेटे, योगेश महाले, सागर गुंजाळ, अजित सरोदे, संचित भारती, शुभम वाबळे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. त्र्यंबक राजदेव यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन शुभम शिंदे यांनी केले. यावेळी अनेक विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रा. स्नेहल थिटमे यांनी आभार मानले.