Breaking News

पायाभूत सुविधा निर्माण करण्यात महाराष्ट्र अव्वल केंद्र शासनाच्या आर्थिक व्यवहार विभागाची माहिती

नवी दिल्ली : पायाभूत सुविधा निर्माण करण्यात महाराष्ट्र राज्य पुन्हा एकदा अव्वल ठरले आहे. गेल्या चार वर्षात राज्यात 284 पायाभूत प्रकल्प मंजूर झाले असून या प्रकल्पाची किंमत 1 लाख 43 हजार 736 कोटी इतकी आहे. केंद्र शासनाच्या आर्थिक व्यवहार विभागाने देशातील पायाभूत सुविधा प्रकल्पांची 31 मार्च 2018 अखेर पर्यंतची माहिती जाहीर केली आहे. या पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये शासकीय पायाभूत सुविधा प्रकल्प, सार्वजनिक क्षेत्रातील प्रकल्प, सार्वजनिक खाजगी भागीदारी प्रकल्प व शासकीय पायाभूत सुविधा प्रकल्पांचा समावेश आहे. 5 ते 50 कोटीहुन अधिक किमतीच्या पायाभूत प्रकल्पांचा यात समावेश आहे.

केंद्रीय आर्थिक व्यवहार विभागाने सन 1990 पासूनच्या देशातील पायाभूत प्रकल्पांची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. गेल्या 28 वर्षात देशात 54 लाख 65 हजार कोटी किमतीचे 9068 पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेण्यात आले, या तुलनेत महाराष्ट्रात 6 लाख 19 हजार कोटींचे 1144 पायाभूत सुविधा प्रकल्पाची कामे हाती घेण्यात आली. महाराष्ट्र पायाभूत सुविधा निर्माण करण्यात अव्वल ठरले असून उत्तरप्रदेश दुसर्‍या स्थानावर आहे, या राज्यात 3 लाख 43 हजार कोटींचे 544 प्रकल्प हाती घेण्यात आले, गोवा हे राज्य पायाभूत सुविधा निर्माण करण्यात तिसर्‍या स्थानावर आहे,या राज्यात 3 लाख 25 हजार कोटी किमतीचे 46 प्रकल्प हाती घेण्यात आले. अरुणाचल प्रदेश चौथ्या स्थानावर तर आंध्र प्रदेश क्रमवारीत पाचव्या स्थानावर आहे.
राज्यात गेल्या चार वर्षात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहेत. सन 2014 ते 2018 या पाच वर्षात 1 लाख 43 हजार 736 कोटी किंमतीचे 284 प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. महाराष्ट्रात सन 2014-15 या वर्षात 21 हजार 579 कोटी 91 लाख किमतीचे 98 प्रकल्प हाती घेण्यात आली. 2015-16 या वर्षात 32 हजार 976 कोटी 73 लाख रुपयांचे 82 प्रकल्प. सन 2016-17 या आर्थिक वर्षात 60 हजार 270 कोटी 71 लाख किमतीचे 82 प्रकल्प तर 2017-18 या वर्षात 28 हजार 909 कोटी रुपयांचे 41 पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. गेल्या चार वर्षात देशात 15 लाख 82 हजार कोटी किमतीचे 3470 पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली, यामध्ये इतर राज्यांचा तुलनेत सर्वाधिक 1 लाख 43 हजार 736 कोटी किमतीचे 284 प्रकल्प हे महाराष्ट्रातील आहेत. गेल्या 28 वर्षात सरासरी वर्षाला 40 पायाभूत सुविधा प्रकल्प राज्यात हाती घेण्यात येत होते, या तुलनेत गेल्या चार वर्षात प्रतिवर्षं 71 पायाभूत सुविधा प्रकल्प महाराष्ट्रात राबविण्यात येत आहेत.