Breaking News

कर्मवीर शंकरराव काळेंच्या जयंतीनिमित्त ‘चला हवा येवू द्या’


माजी खा. कर्मवीर शंकरराव काळे यांच्या जयंतीनिमित्त मराठी प्रेक्षकांच्या अव्वल पसंतीचा झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येवू द्या’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. युवा नेते आशुतोष काळे यांच्या संकल्पनेतून येथील रसिकांसाठी या कार्यक्रमाचे चक्क मोफत आयोजन करण्यात आले आहे.
सालाबाद प्रमाणे याहीवर्षी कोसाका उद्योग समुहाचे संस्थापक माजी खा. कर्मवीर शंकरराव काळे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. त्यानिमित विविध धार्मिक, सामाजिक व मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या शुक्रवारी {दि. ६} सकाळी ९.०० वाजता कारखाना कार्यस्थळावरील कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यानातील कर्मवीर शंकरराव काळेंच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करण्यात येईल. सायंकाळी साडेपाच वाजता कोपरगाव तहसील कार्यालयाच्या भव्य मैदानावर कोपरगाव तालुक्यातील रसिकांना मनमुराद हसविण्यासाठी लोकप्रियतेच्या शिखरावर असणा-या ‘चला हवा येवू द्या’ या कार्यक्रमाचे कलाकार कोपरगावला येणार आहेत. 

यामध्ये सुप्रसिद्ध विनोदी कलाकार भाऊ कदम, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, अंकुर वाढवे, यांच्या समवेत ‘वाजले की बारा’ फेम सुप्रसिद्ध नृत्यांगना सिनेअभिनेत्री अमृता खानविलकर, ‘माझ्या नव-याची बायको’ फेम गुरु अर्थात अभिजित खांडकेकर, सारेगमप लिटल चँपस फेम प्रसिद्ध गायक रोहित राऊत, आरोही म्हात्रे आदी दिग्गज कलाकारांना जवळून पाहण्याची, अनुभवण्याची संधी कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाने माजी खा. काळे यांच्या जयंतीनिमित्त उपलब्ध करून दिली आहे. या कार्यक्रमास कोपरगाव तालुक्यातील रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन कर्मवीर शंकररावजी काळे मित्र मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.