प्लास्टिक बंदी : आणखी काही काळ हवाय! व्यापारी वर्गाचा सूर
राज्यसरकारने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी ही सुरु केली आहे. मात्र ही अंमलबजावणी गंभीरपणे होण्याची गरज निर्माण झाली आहे. अर्थात यासाठी नागरिक प्रतिसाद देत असले तरी त्यासाठी लोकांची मानसिकता निर्माण होण्यास आणखी काही काळ लागणार आहे, असा काहीसा सूर व्यापारी वर्गातून दिसून येत आहे.
प्लास्टिक बंदीच्या शासन निर्णयाला जरी उत्पादक कंपन्यांनी विरोध केला असला तरी नागरिकांना प्लास्टिक वापराची सवय सोडायला काही अवधी जाऊ द्यावा लागणार आहे, असेच काहीसे चित्र शिर्डीसह राहाता तालुक्यात दिसून येत आहे. नागरिक बाजारात जाताना १५ ते २० वर्षापूर्वी पिशवी घेऊन बाहेर पडत. मात्र काळ बदलला आणि ज्याठिकाणी खरेदी केली त्याच ठिकाणी खरेदीनंतर आर्कषक अशा प्लॅस्टिक पिशवीत ‘पॅकिंग’ केलेल्या वस्तू मिळू लागल्या. त्याची सवयच महिला वर्गासह तमाम नागरिकांना झाली. मात्र या प्लास्टिक पिशव्या कशा नष्ट करायच्या, असा प्रश्न नगरपंचायत नगरपालिका व महानगरपालिकांनाही पडलेला होता. सहजासहजी या प्लास्टिक पिशव्या नष्ट होत नाहीत. जर सांडपाण्याच्या गटारीत वाहत गेल्या तर त्या गटारीत वाहत असलेले पाणीसुद्धा मोठ्या प्रमाणावर अडवतात.
अलीकडे विक्रेतेही प्लास्टिक बंदीची आठवण करून देत असल्याने नागरिकांची मानसिकता तयार होण्यास मोठा हातभार लागणार आहे. पूर्वी मेडिकलच्या दुकानातही औषधे कागदी पिशवीत टाकून दिली जात असत. काही ठिकाणी नागरिकांनी मोकळी पाण्याची बाटली परत देऊन एक रुपयाची मागणी केली असता कोणीही सहजपणे एक रुपया देण्यास तयार नाही. शासनाने मात्र तशा सूचना केल्या होत्या. यापूर्वी परमिटरुम, वाईन शॉपीच्या बाटल्या याठिकाणी येणाऱ्या ग्राहकांना पिशवीत दिल्या जात होत्या. आता मात्र त्यास काही ठिकाणी नकार दिला जात असल्याने ग्राहकच जाताना स्वतःबरोबर पिशवी घेऊन जात आहे. मात्र असले तरी प्लॅस्टिक पिशवीच्या बाबतीत आणखी कडक धोरण संबंधित विभागाने घेतले तर त्याचे चांगले परिणाम व शासनाचा हेतू सफल होईल.