Breaking News

कर्मवीर शंकरराव काळे ध्येयवादी व्यक्तिमत्व : लांजुळकर


कोपरगाव ता. प्रतिनिधी - समाजाच्या उत्कर्ष साधायचा असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही, हा विचार डोळ्यासमोर ठेवून संपूर्ण आयुष्य शिक्षणासाठी वाहून घेणारे माजी खा. कर्मवीर स्व. शंकरराव काळे ध्येयवादी, व्रतस्थ व्यक्तिमत्व आहे, असे प्रतिपादन राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आश्रम गुरुकुंज, अमरवाती येथील राष्ट्रीय प्रबोधनकार सुनील महाराज लांजुळकर यांनी केले. प्रबोधनपर खंजिरी कीर्तनरुपी सेवेत पोहेगाव येथे ते बोलत होते. 

शिक्षणमहर्षी, माजी खासदार, कर्मवीर शंकरराव काळे यांच्या जयंतिनिमित्त प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांच्या धार्मिक व सामाजिक विचारातून कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव, चांदेकसारे, बहादराबाद, वेस-सोयेगाव, रांजणगाव देशमुख, मल्हारवाडी आदी ठिकाणी राष्ट्रीय प्रबोधनकार श्री सुनीलमहाराज लांजुळकर यांच्या रसाळ वाणीतून प्रबोधनपर खंजिरी कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मंगळवार ते {दि. १० } रविवारपर्यंत {दि. १५ } प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. समाजात महिलांना मानाचे स्थान मिळावे. आजचा युवक व्यसनापासून दूर राहावा, समाजामध्ये जागृती व्हावी, यासाठी अशा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे मंडळाच्या अध्यक्षा पुष्पा काळे यांनी यावेळी सांगितले. 

या किर्तनाच्या माध्यमातून प्रबोधनकार सुनील महाराज लांजुळकर यांनी सामाजिक विषमता अज्ञानामुळे निर्माण होत आहे. मनुष्याच्या जन्मापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत जन्माला येणा-या प्रत्येक व्यक्तीवर सोळा संस्कार केले जातात. याची माहिती दिली. गरोदर स्त्रियांनी टी. व्ही. पाहू नये टी. व्हीचे संस्कार जन्माला येणा-या बाळावर होतात. व्यसन करू नका. व्यसनाने संसार उध्वस्त होत असल्याचे सांगितले. 

याप्रसंगी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे, सभापती अनुसया होन, कर्मवीर काळे कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन सचिन रोहमारे, संचालक सुनील शिंदे, एम. टी. रोहमारे, राहुल रोहमारे, संजय रोहमारे, राजेंद्र औताडे, नंदकिशोर औताडे, केशव जावळे, चंद्रकांत औताडे आदींसह पोहेगाव ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.