प्राणीमित्रांनी वाचविले घुबडाचे प्राण!
मंगळवारी सकाळी संजीवनी साखर कारखान्याच्या परिसरात जखमी घुबड आढळून आले. मांजामध्ये अडकुन पडलेले घुबड सुटकेसाठी प्रयत्न करीत होते. मात्र त्याची सुटका काही होत नव्हती. तर दुसरीकडे कावळयांनी त्याला टोचा मारून मारून बेजार केले होते. ही बाब संजीवनी लेखा शाखेचे हौशिराम गोर्डे व मच्छिंद्र कोल्हे यांच्या लक्षात आली. त्यामुळे त्यांनी लांब काठी-पाईप आणून त्याला अलगदपणे नारळाच्या झाडाहून जमीनीवर घेतले. त्यासाठी सर्वश्री वाल्मीक कळसकर प्रविण कदम संजीवनी साखर कामगार पतपेढीचे अध्यक्ष चंद्रकांत जाधव गणेश वाबळे आदींनी मदत केली. अशोक टुपके व गोरख पेकळे यांनी त्याच्या पायावर झालेल्या जखमा डेटाॅलने धुवुन काढल्या. बेटाडीन नावाचे औषध त्यावर लावले. दरम्यान, निफाड येथील पक्षीमित्र दत्ता उगांवकर यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करण्यात आला. त्यांना जखमी घुबडाचे छायाचित्रे व्हाॅटसअॅपच्या माध्यमातून पाठविण्यात आले. त्यावर त्यांनी काय उपचार करावयाचे, याची माहिती दिली. ‘संजीवनी’च्या या प्राणीमित्रांनी जखमी घुबडाला पाणी पाजून त्याच्या खानपानाची व्यवस्था केली. घुबडाचे प्राण वाचल्याचा आनंद सर्वांच्या चेह-यावर ओसंडून वाहत होता.