Breaking News

व्यापार्‍याने बुडविलेले पैसे मनमाड बाजार समिती शेतकर्‍यांना मिळवून देणार - डॉ.संजय सांगळे

मनमाड, दि. 12, एप्रिल - मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा व्यापार्‍यांनी परिसरातील अनेक शेतकर्‍यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बाजार समिती प्रशासन खडबडून जागे झाले व संचालक मंडळाने तातडीने विशेष सभा बोलावून त्यात व्यापार्‍याकडे शेतकर्‍यांचे अडकलेल्या रकमेपैकी तातडीची मदत म्हणून 50 टक्के रक्कम बाजार समिती फंडातून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची मंजुरी घेण्यासाठी प्रस्ताव डीडीआरकडे पाठविण्यात आल्याची माहिती सभापती डॉ.संजय सांगळे यांनी दिली. उर्वरित रक्कम व्यापार्‍यांची मालमत्ता जप्त करून तिचा लिलाव केल्यानंतर देण्यात येणार असून ज्या व्यापार्‍यांनी शेतकर्‍यांची फसवणूक केली आहे त्यांचे परवाने रद्द करण्यात आल्याचे ही डॉ.सांगळे यांनी सांगितले.


मनमाड कृषी बाजार समितील अंबादास लष्करे (चामुंडा इंटरप्रायझेस), सागर गुंजाळ (शशिकांत ट्रेडिंग कंपनी) आणि मनोहर गोसावी (श्रीहरी ओम ट्रेडर्स) या तीन कांदा व्यापार्‍यांनी जानेवारी, फे ब्रुवारी, मार्च या महिन्यात 157 शेतकर्‍याकडून कांदा खरेदी केल्यानंतर त्यांना चेक दिले होते.शेतकर्‍यांनी त्यांना मिळालेले चेक बैन्केत जमा केले मात्र व्यापार्‍यांच्या खात्यावर पैसे शिल्लक नसल्यामुळे चेक बाउंस झाल्यानंतर शेतकर्‍यांनी व्यापार्‍याकडे धाव घेतली असता लवकरच तुमचे पैसे अदा करू असे आश्‍वासन व्यापार्‍यांनी दिले होते. मात्र वारंवार चकरा मारून देखील पैसे मिळत नसल्याचे पाहून शेतकर्‍यांनी बाजार समिती प्रशासनाकडे तक्रारी केल्या. बाजार समिती प्रशासनाने देखील व्यापार्‍यांना शेतकर्‍यांचे पैसे अदा करण्यास सांगितल्या नंतर व्यापार्‍यांनी काही मुदत मा गितली होती. मात्र मुदत संपल्यानंतर ही व्यापार्‍यांनी शेतकर्‍यांचे पैसे दिले नाही. त्यामुळे अखेर या व्यापार्‍याविरुद्ध पोलीस स्थानकात तक्रार करण्यात आली असल्याचे डॉ.सांगळे यांनी सांगितले.
व्यापार्‍यांनी सुमारे 32 लाख 43 हजार 197 रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले असून या फसवणुकीमुळे शेतकरी अडचणीत सापडले आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी त्यांची अडकलेल्या रक मेपैकी 50 टक्के रक्कम बाजार समिती देणार सून उर्वरित रक्कम ही व्यापार्‍यांची मालमत्ता जप्त केल्यानंतर तिचा लिलाव करून शेतकर्‍यांना पैसे अदा केले जातील. शेतकर्‍यांचा एक रुपया देखील बुडणार नाही अशी ग्वाही सभापती डॉ सांगळे यांनी दिली.