संगमनेरकरांनी आ. थोरातांचे नेतृत्व जपावे : निंबाळकर
बाळासाहेब थोरात सोज्वळ आणि नम्र स्वभावाचे आहेत. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात आणिआ. बाळासाहेब थोरात यांच्या घराण्याने विकासाची परंपरा निर्माण केली आहे. विकास कार्यातूनच त्यांनी जनतेचे प्रेम आणि आदरभाव मिळविला. संगमनेरच्या जनतेने बाळासाहेब थोरात यांचे नेतृत्व जपण्याचे आवाहन राज्य विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
तालुक्यातील पेमगिरी येथे उद्योजक रोहित डुबे व ग्रामस्थांच्या भरीव सहकार्यातून जिर्णोध्दार करण्यात आलेल्या मारुती मंदिराच्या समारंभात निंबाळकर बोलत होते. यावेळी माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात, पारनेरचे आ. विजय औटी, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, अॅड. माधवराव कानवडे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
निंबाळकर म्हणाले, अहमदनगर व सातारा जिल्ह्याचे नाते आहे. मी व बाळासाहेब थोरात यांनी आजवरच्या राजकारणात खूप आमदार व मंत्री पाहिले आहेत. मात्र बाळासाहेब थोरात यांचा स्वभाव पहिल्यासारखाच आजही आहे. नम्र स्वभावाचे बाळासाहेब महसूल मंत्री असतांनाही तसेच होते. तर आता राज्यात विरोधात असले तरी तसेच आहेत. थोरातांचे कर्तृत्व चांगले असल्याने ‘मोदी लाट’ येवो ‘औटी लाट’ येवो की ‘निंबाळकर लाट’ येवो, याची भीती नाही. मी कधी राजासारखा वागलो नाही. आई - वडीलांची किर्ती वाढवावी, या दृष्टीने सार्वजनिक जीवनात मी कार्यरत आहे. सत्तेचा वापर हा ज्यांनी सत्ता दिली, त्यांच्या आयुष्यात बदल होण्यासाठी केला पाहिजे. बाळासाहेबांनी सत्तेचा वापर संगमनेरच्या कल्याणासाठी केला आहे. समाजसेवक अण्णा हजारे यांचे समवेत बाळासाहेबांबरोबरच माझेही जिव्हाळ्यााचे संबंध आहेत. नगर जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळी परिस्थितीत ही नैसर्गिक पध्दतीचा विनियोग करुन शेती फुलवितो, याचे मोठे कौतुक मला आहे.
आ. थोरात म्हणाले की, पेमगिरी मारुती मंदिर म्हणजे सुंदर दागिना घडवावा, तसे मंदिर घडले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची प्रेरणा पेमगिरीतून मिळाली आहे. त्यामुळे पेमगिरी गाव ऐतिहासिक असून गावाला अनन्य साधारण महत्व आहे. ऐतिहासिक शहागड, विस्तीर्ण वड यामुळे गावचा लौकिक वाढला. पेमगिरीचा जगात लौकीक होण्यासाठी सर्वांसमवेत माझे सहकार्य राहिल अशी ग्वाही देत उद्योजक रोहित डुबे व ग्रामस्थांचे कौतुक केले.
यावेळी ‘पेमगिरी : स्वराज्य संकल्प भूमी’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आ. विजय औटी, उद्योजक रोहित डुबे यांनी मनोगत व्यक्त केली. प्रारंभी सरपंच सोमनाथ गोडसे यांनी प्रास्ताविक केले. उद्योजक रोहित डुबे यांचा मान्यवरांच्या हस्ते सपत्निक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास सभापती निशा कोकणे, शिवाजीराव थोरात, मिलींद कानवडे, रामहरी कातोरे, विलास कवडे, अजय फटांगरे, बाळासाहेब मोरे, रमेश गुंजाळ, सतिष कानवडे, सुधाकर आव्हाड, युवराज निंबाळकर, सत्यजित निंबाळकर, फुटरमल मेहता, शैलेश दांगट, राधेशाम मालानी, पांडुरंग घुले, शांताराम डुबे, राजुकाका डुबे, नवनाथ आरगडे, सुनिता कानवडे, कृष्णकुमार गोयल, व्दारकादास सोनी, अशोक गोगावले, महेंद्र राठोड आदीसंह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.