Breaking News

रुग्णांचे नातेवाईक घेऊन जाणाऱ्या बसवर हल्ला


शिर्डी/प्रतिनिधी - शिर्डी येथील साईबाबा हॉस्पिटलमधील दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना घेऊन जाणाऱ्या साईबाबा संस्थानच्या बसवर {क्र. एम. एच. १७ ८५०४} निमगाव-कोऱ्हाळे शिवारातील हेलिपॅड रस्त्यालगतच्या सर्कलजवळ काल {दि. ३१} सायंकाळी ९ च्या सुमारास हल्ला करण्यात आला. बसचालकावर हल्ला करून त्याचा २० हजार रु. किंमतीचा मोबाईल चोरून नेला. 

अनोळखी ३ ते ४ इसमांनी या बसला अचानक दुचाकी आडवी लावून बसचालकाला चोप दिला. यापूर्वीही या रस्त्यावर लूटमार व मारहाणीच्या घटना घडलेल्या आहेत. या रस्त्यालगत मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टीचा परिसर आहे. अनेकजण बाहेर गावाहून येऊन वास्तव्य करत आहेत. गुंड प्रवृत्तीच्या या तरुणांकडून साईभक्तांना मारहाणीचे प्रकारही यापूर्वी घडलेले आहेत. या रस्त्यावर अंधाराचे मोठ्या प्रमाणावर साम्राज्य असते. साईभक्तांना या परिसराची माहिती नसते. या संधीचा फायदा घेऊन अशा प्रकारचे हल्ले केले जातात. याप्रकरणी पोलीस प्रशासनाने खंबीर भूमिका घेण्याची गरज निर्माण झाली आहे. या परिसरात काही वर्षां पूर्वी एका तरुण मुलाचा मृतदेह सापडला होता. त्या घटनेचा अजूनही तपास लागलेला नाही. यामुळे साईबाबा संस्थानच्या कामगारांत भितीचे वातावरण आहे. या लूटप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.