Breaking News

खडकवाडी ग्रामस्थांनी महावितरणच्या कर्मचार्‍यांना कोंडले


पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथे पुर्ण दाबाने वीजपुरवठा होत नसल्याने व वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे सोमवारी खडकवाडी येथील विद्युत उपकेंद्राच्या कर्मचार्‍यांना भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे राज्य सचिव किरण वाबळे यांच्या नेतृत्वाखाली संतप्त खडकवाडी ग्रामस्थांनी दोन तास कोंडून ठेवले. महावितरणचे उपकार्यकारी अभियंता मंगेश प्रजापती यांच्या लेखी आश्‍वासनानंतर आंदोलन थांबवण्यात आले.

खडकवाडी ग्रामस्थ गेली अनेक दिवसांपासून विजेच्या लपंडावामुळे त्रस्त असुन विजेच्या वारंवार खंडित होण्यामुळे व पुर्णक्षमतेने वीजपुरवठा मिळत नसल्याने शेतकर्‍यांचे आतोनात हाल होत असुन अनेक शेतकर्‍यांचे कृषिपंप जळाले आहेत. तसेच गावाला पाणीपुरवठा करणार्‍या योजनेचा पंप देखील पुरेशी वीज मिळत नसल्याने सुरू होत नाही, म्हणून गेली अनेक दिवसांपासून गावाला पिण्याचे पाणी मिळत नाही. ग्रामस्थांनी अनेकदा महावितरणकडे याबाबत पाठपुरावा केला. तसेच महसूल प्रशासनासही याप्रकरणी लक्ष देण्यास सांगितले. परंतू प्रशासनाकडून जाणिवपूर्वक अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने अखेर खडकवाडी ग्रामस्थांचा उद्रेक होऊन सोमवारी ग्रामस्थांनी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या राज्य सचिवांसह अन्य पदाधिकार्‍यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या कर्मचार्‍यांना दोन तास कोंडून ठेवले. त्यानंतर काही कार्यकर्त्यांनी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता मंगेश प्रजापती यांना अक्षरशः गाडीत घालून आंदोलनस्थळी आणले. तद्नंतर त्यांनी आंदोलकांना दोन दिवसात वीजपुरवठा सुरळीत करण्याचे लेखी आश्‍वासन दिल्याने आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.

या आंदोलनात भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे खडकवाडी येथील पदाधिकारी गणेश चौधरी, रवी ढोकळे, राजू रोकडे, विकास रोकडे, शिवप्रहारचे तालुकाध्यक्ष अमोल रोकडे, दिलीप ढोकळे, धनंजय ढोकळे, पळशीचे उपसरपंच आप्पा शिंदे, मांडव्याचे देवराम हारदे, भाऊ जाधव, सुनिल गागरे, सबाजी गागरे यांसह शेकडो शेतकरी बांधव सहभागी झाले होते.