Breaking News

मक्का मशीद बॉम्बस्फोट : निकाल देणार्‍या न्यायाधीशांचा राजीनामा फेटाळला

हैदराबाद : बहुचर्चित मक्का मशीद बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल देणारे न्यायाधीश रवींद्रा रेड्डी यांचा राजीनामा आंध्र प्रदेश आणि तेलंगणा उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. रेड्डी यांनी तात्काळ कामावर रुजू व्हावे, असेही न्यायालयाने सांगितले आहे. मक्का मशीदप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने सोमवारी अंतिम निर्णय घोषित करत सर्व आरोपींची निर्दोष सुटका केली. निकाल जाहीर झाल्याच्या काही तासातच रेड्डी यांनी राजीनामा दिला होता. हैदराबादमधील मक्का मशीद येथे 18 मे 2007 ला झालेल्या हल्ल्यात नऊ जणांचा मृत्यू झाला होता तर 58 जण जखमी झाले होते. उजव्या विचारसरणीच्या दहशतवाद्यांनी हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप होता. या प्रकरणी 10 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यापैकी पाच आरोपींविरोधी खटल्याचा निर्णय सोमवारी देण्यात आला. पुराव्याअभावी सर्व आरोपींना न्यायालयाने निर्दोष घोषित केले.