Breaking News

सोहराबुद्दीन’ प्रकरणातील 50 वा साक्षीदार फितूर

मुंबई : सोहराबुद्दीन बनावट चकमकप्रकरणी सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान गुरूवारी आणखी एक साक्षीदार फितूर म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे आता फितूर साक्षीदारांची संख्या 50 वर पोहोचली आहे. मंजुषा आपटे या साक्षीदाराने न्यायालयात साक्ष देताना सांगितले की, शेख आणि त्याची पत्नी ज्या बसमधून प्रवास करत होती, त्याच बसमधून मी देखील प्रवास करत होते. पण त्यावेळी मी झोपलेली असल्याने मी त्यांना पाहिले नाही. यानंतर विशेष सरकारी वकील बी. पी. राजू यांनी संबंधित साक्षीदाराला फितूर म्हणून घोषित केले. गुजरात पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने शेख आणि त्याची पत्नी कौसर बी यांना 2005 मध्ये हैदराबाद येथून ताब्यात घेतल्याचा आरोप आहे. दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार शेख याचा बनावट चकमकीत खून करण्यात आल्याचा आरोप आहे. कौसर बी हिची देखील नंतर हत्या करण्यात आली. तसेच पोलिसांनी डिसेंबर 2006 मध्ये शेख याची मदतनीस व चकमकीची साक्षीदार तुलसी प्रजापती हिची देखील गुजरातमधील बनसकांठा जिल्ह्यातील चापरी गावात हत्या केल्याचा आरोप आहे. संबंधित बनावट चकमकीचे प्रकरण 2012 मध्ये निष्पक्ष सुनावणी होण्यासाठी सीबीआयने हे प्रकरण मुंबईला हस्तांतरित केले. 2013 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने शेख आणि प्रजापती चकमक प्रकरणाला एकत्रित केले.