गोमातेला कत्तलखान्यात पाठवून पापाचे भागीदार होऊ नका - भागवताचार्य गजानन महाराज शास्त्री
नेवासा, गोमाता ही आपल्या मातेप्रमाणेच असल्याने राष्ट्रीय कर्तव्य समजून आई प्रमाणेच गोमातेची सेवा करा, तिला कत्तलखान्यात पाठवून पापाचे भागीदार होऊ नका असे भावनिक आवाहन बुलढाणा जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथील श्री क्षेत्र ओलांडेश्वर संस्थानचे प्रमुख गुरुवर्य गजानन शास्त्री महाराज यांनी केले. नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण भवार यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात गजानन शास्त्री महाराज हे बोलत होते. टोका येथील श्री सिद्धेश्वर देवस्थानचे प्रमुख महंत 1008 बालब्रम्हचारी महाराज यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते .प्रारंभी हनुमंतरायाच्या प्रतिमेचे संत महंतांसमवेत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मिरवणुकीचा समारोप प्रवरासंगम येथील हनुमान मंदिर प्रांगणात झाल्यानंतर कार्यक्रमाचे संयोजक लक्ष्मण भवार ,उदयन गडाख यांच्या हस्ते महंत बालब्रम्हचारी महाराज व भागवताचार्य गजानन महाराज शास्त्री यांचे संत पूजन करण्यात आले तसेच मारुतीरायाला अभिषेक ही घालण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य निवृत्ती सुडके,माजी सरपंच गजानन चव्हाण, मुळा कारखान्याचे संचालक बाळासाहेब पाटील, भारतीय लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष शांतवन खंडागळे, उपसरपंच वसंत डावखर, बाबा महाराज जाधव, भाजपचे जिल्हा चिटणीस नितीन दिनकर, बजरंग दलाचे संतोष पडूंरे, शंकरराव कदम,बाळू भवार, रमेश ललवाणी, बबन कदम, अरुण माळी यांच्यासह भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.