Breaking News

रेहेकुरी-नांदगाव मार्गावरील भगदाड बुजविण्याचे काम अखेर सुरु

कर्जत तालुक्यातील रस्त्यावरील अनेक पुल खचलेले आहेत.पुलांना जागोजागी भगदाड पडलेली आहेत. रेहेकुरी-नांदगाव मार्गावरील पुलाला रस्त्याच्या मधेच भगदाड पडल्याने प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागत होता. याबाबत दै.लोकमंथनने पुलाच्या भगदाडाने प्रवाशांचा जीव धोक्यात या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करुन प्रवाशांची गैरसोय जनतेसमोर आणली होती. त्यामुळे अखेर या पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असुन प्रवाशांच्या अपघाताचा धोका आता टळणार आहे.

नांदगाव-रेहेकुरी डांबरीकरण रस्त्यावर पुलाचे काँक्रीटीकरण कोसळल्याने मोठे भगदाड पडलेले होते. रस्त्याच्या मध्याभागीच भगदाड पडल्याने दुचाकी, चारचाकी वाहने रस्त्यात अडत असल्याने अपघात वाढले होते. रात्री अपरात्री भगदाड दिसत नसल्याने दुचाकीस्वार खड्ड्यात अपघात होत होते. या प्रश्‍नावर सचित्र वृत्त प्रसिद्ध लोकमंथनने लक्ष वेधले होते. सामाजिक कार्यकर्ते आण्णा बागल यांनीही याप्रश्‍नी आवाज उठवला होता. सध्या बांधकाम विभागाकडुन भगदाड बुजविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. मात्र काम सुरु असल्याचा फलक कामाच्या ठिकाणी दोन्ही बाजुस लावला नसल्याने बांधकाम विभागाचा हलगर्जीपणा समोर येत आहे.