Breaking News

शेतकरी, कष्टकरी व कामगार यांच्यासाठी मनसे रस्त्यावर उतरणार : अभ्यंकर


श्रीरामपूर / शहर प्रतिनिधी /- नव्याने पक्ष बांधणी करून शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला, विदयार्थी, व्यापारी, नोकरदार आदी घटकांसाठी पक्षाकडून लागेल ती मदत करणार असून त्यांचे 
प्रश्‍न सोडवण्यासाठी सर्व स्तरावर आंदोलन करून रस्त्यावर उतरणार असल्याचे मनसेचे प्रवक्ते अविनाश अभ्यंकर यांनी श्रीरामपूर येथील आयोजित पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना सांगितले. श्रीरामपूर येथे मनसे कार्यकर्त्यांचा मेळावा शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संपर्क अध्यक्ष अनिल चितळे, ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप पाचंगे, उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, तुषार बोबडे, रमेश कोळेकर, संजय नवथर, सोमनाथ धनगर, यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोटारसायकल रॅली काढून त्यांचे जंगी स्वागत केले. अभ्यंकर पुढे म्हणाले की, मनसेची एवढी मोठी ताकद पाहून मी भारावून गेलो आहे. राज साहेबांच्या अडचणीच्या काळात तुम्ही त्यांना साथ दिली असून त्यांचे कार्य तळागाळातील लोकांपार्यांत पोहिचवण्याचे काम केले आहे. तुमच्या कार्याची दखल घेऊन श्रीरामपुरात राज साहेबांची सभा घेऊ असे आश्‍वासन त्यांनी दिले. पुढे ते म्हणाले कि,भाजपने अनेक घोषणा केल्या लोकांना आमिष दाखवले. दैनंदिन आवश्यक वस्तूंचे भाव वाढवले. खोटी आश्‍वासने देऊन निवडणुका जिंकल्या. नोटबंदी, जीएसटी मुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. अशा थापाड्या सरकारला लोकांनी धडा शिकवावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उवस्थित होते.