Breaking News

फडणवीस सरकार हे शेतकरी विरोधी राष्ट्रवादीच्या हल्लाबोल सभेत अजित पवार यांची टीका

जयसिंगपूर : राष्ट्रवादीचा गड असलेल्या पश्‍चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या हल्लाबोल सभांना प्रचंड प्रतिसाद मिळत असून, जयसिंगपूर येथे झालेल्या सभेला जनसागर लोटला होता. या सभेत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना सरकारवर हल्ला चढविला. काळया आईची सेवा करायची आणि शेतकर्‍यांच्या शेतमालाला सध्या दर किती मिळतोय, कोबी, टोमॅटो, कांदा या पिकांना तर दरच नाही.राज्यातील हातमागाचा धंदा, साखर उद्योग, दुध धंदा हे सगळे अडचणीत आहेत. राज्यातील फडणवीस सरकार हे शेतकरी विरोधी असल्याचा घणाघात माजी उपमुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी जयसिंगपूरच्या जाहीर सभेत केला.


देशाचा कृषीमंत्री कोण असं जर शेतकर्‍यांना विचारलं तर त्यांना ते सांगता येत नाही.परंतु या देशाचे कृषीमंत्री शरद पवार होते त्यावेळी शेतकरी हक्काने शेतीच्या समस्या मांडत होते. आपल्या शेतकर्‍यांचा तारणहार कोण असेल तर ते म्हणजे शरद पवार आहेत अशी भावना शेतकर्‍यांची आजही आहे.अजित पवार यांनी आपल्या भाषणामध्ये राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. कुख्यात डॉन जाऊद इब्राहिमच्या मुसक्या आवळून बांधून आणू असे आश्‍वासन भाजपने सत्तेत येण्यापूर्वी दिले होते. परंतु सत्तेत आल्यावर अहो यांना दाऊदचा साधा रुमालही सापडला नाही.कशाचं काय. नुसती खोटी आश्‍वासने सरकार देत आहे अशी टिका त्यांनी केली.भाजप-शिवसेनेतील युतीबाबत बोलताना पवारांनी म्हटले की, तु मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो असं दुटप्पी राजकारण करत आहेत.
शेतकरी मुद्दयावर बोलताना अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार,चंद्रशेखर बावनकुळे,गिरीष बापट, गिरीश महाजन यांच्याकडे पाहिले तर हे शेतकरी तरी वाटतात का असा टोला लगावतानाच राज्यातील गरीबांच्या 1400 शाळा बंद करण्याचा घाट सरकारने घातला असून, गरीबांच्या मुलांनी शिकू नये असाच प्रयत्न सरकारचा असून विनोदाच्या तावडीत शिक्षण सापडले असल्याची जोरदार टिका केली. सरकारने निर्णय घेतले नाही तर अनेक साखर कारखाने पुढच्या वर्षी बंद पडतील. संस्था उभी करायला अक्कल लागते, उद्ध्वस्त करायला अक्कल लागत नाही. सरकारमध्ये एकही मंत्री असा नाही जो शेतकर्‍यांना न्याय देईल, अशी खंतही पवार यांनी आपल्या भाषणात केली. रोज जवान शहीद होत आहे, का पाकिस्तानला जशासतसे उत्तर दिले जात नाही ? 56 इंचाची छाती कुठे गेली ? पाकिस्तानच्या पंतप्रधानाना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मोदी पाकिस्तानला जातात. हा काय प्रकार आहे असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.