Breaking News

कठुआ बलात्कार प्रकरणाच्या निष्पक्ष सुनावणीची काळजी : सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : कठुआ बलात्कार व खून प्रकरणाचे आरोपपत्र सादर करताना वकिलांनी घातलेल्या गोंधळावर आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या निष्पक्ष सुनावणीबद्दल काळजी व्यक्त केली. यावेळी संबंधित वकिलांनी आपले आंदोलन वेगळ्या कारणासाठी असल्याचा दावा केला, मात्र न्यायालयाने तो फेटाळत आपली नाराजी व्यक्त केली.

सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले, की आम्हाला इतर कशाची काळजी नसून कठुआ प्रकरणाच्या निष्पक्ष सुनावणी विषयी काळजी आहे. पोलिसांना या प्रकरणी न्यायाधिशांच्या निवासस्थानी आरोपपत्र दाखल करायचे होते, त्यावेळी वकिलांनी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण केली. यावेळी संबंधित वकिलांनी आपण दुसर्‍या विषयावर निदर्शने करत होतो, मात्र आपला विषय आरोपपत्र दाखल करण्याच्या प्रकरणाशी जोडला गेल्याचा दावा केला. मात्र, न्यायालयाने निदर्शनांचे कारण काहीही असले तरी त्यामुळे झालेला परिणाम चुकीचाच होता, असे खडसावले. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी सर्व पक्षांना घडलेल्या घटनेबाबत आणि वकिलांच्या वर्तणुकीविषयी आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 26 एप्रिलला होणार आहे.