Breaking News

...तर माझ्या नेतृत्वाला कोणीही धक्का लावू शकत नाही ः ना. पंकजा मुंडे


सर्वसामन्य जनता माझ्या पाठीशी जोपर्यंत आहे, तोपर्यंत माझ्या नेतृत्वाला कोणीही धक्का लावू शकत नाही, स्व.गोपीनाथ मुंडे यांनी 40 वर्षे राजकारण न करता गोरगरीब, दीन दलित, वंचित, शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर हसू व आनंद राहण्यासाठी संघर्ष केला. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विकास कामातून एक प्रकारे संधी मिळाली असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री ना. पंकजा ताई मुंडे यांनी केले.
वंजारवाडी (ता. नेवासा) येथे ग्रामस्तांच्या वतीने सत्कार समारंभाप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. बाळासाहेब मुरकुटे होते. यावेळी माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे, शिवसेनेचे रामदास गोल्हार, भाजपचे ज्येष्ठ बंदुभैय्या चंदेल, जिल्हा सरचिटणीस सचिन देसरडा, जि.प. सदस्य दत्तात्रय काळे, आंबादास दराडे, पराजी दराडे, पंकज दराडे, वासुदेव दराडे, बाबासाहेब दराडे, राजू दराडे, अ‍ॅड. स्वप्निल सोनवणे, कैलास आव्हाड यांच्यासह नेवासे नगर पंचायत समितीचे सदस्य, बी.डी.ओ, तलाठी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
ना. मुंडे म्हणाल्या की, ही काही सभा, विकास शुभारंभ नाही. मी केवळ स्नेहभेट म्हणून आले. वै. वामनभाऊ व भगवान बाबा यांना स्मरून या तालुक्यात विकासासाठी आ. बाळासाहेब मुरकुटे यांनी जो काही निधी मार्फत विकसित भाग करण्याचा सपाटा लावला आहे, असाच विकास या गावात दिसला पाहिजे, तरच भविष्यात आ. मुरकुटे यांना अच्छे दिन आहेत. त्यांनी भविष्याची चिंता करू नये.
यावेळी सत्कार, निवेदन देण्यासाठी कार्यकर्त्यांची, पदाधिकार्‍यांची, चांगलीच झुंबड उडाली होती. वंजारवाडी येथील गावांतर्गत पाच किलोमीटर रस्त्याचे काम, पिण्याच्या पाणीसाठी तलाव, मंदिरासाठी सभामंडप होण्याची मागणी करताच तिन्ही कामांना ना. मुंडे यांचेसमक्ष आ. मुरकुटे यांनी काम हाती घेण्याचे जाहीर केले. यावेळी प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला.
त्या दरम्यान घोडेगाव इथे परिसरातील रस्त्या प्रश्‍नाबाबत भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सचिन देसरडा यांनी निवेदन देऊन सत्कार करण्यात आला.
ग्रामस्थांच्या वतीने मा. सरपंच आंबदास दराडे, बाबासाहेब दराडे, राजू दराडे, पराजी दराडे, मित्तु दराडे आदींनी ना. मुंडे यांचा सन्मान केला.
आ. मुरकुटे म्हणाले की, संत वामनभाऊ व भगवान बाबा यांच्या पावनभूमीत स्व. मुंडे यांच्या प्रेरणेने राजकीय वाटचालीत नेवासा तालुक्यात 90 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून स्व. मुंडे यांचे स्वप्न साकार करून पंकजाताईंचा सिंहाचा वाटा असून त्यांच्या संघर्ष यात्रेमुळे नेवासा मतदासंघात परिवर्तन घडले. जलसंधारण, जि.प, पं.स, व ग्रामविकास निधीतून सर्व वाडी-वस्तीचे रस्ते जोडणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सरपंच अंबदास दराडे यांनी केले. सूत्रसंचालन रामनाथ बडे, उद्धव आव्हाड यांनी तर आभार बाबासाहेब दराडे, राजू दराडे यांनी मानले.