Breaking News

आरोपींना फाशी तर प्रकरण दडपणार्‍यांवर कारवाईची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- कठुआ (श्रीनगर) येथे आठ वर्षाच्या निरागस मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार तसेच उत्तरप्रदेशात उन्नावमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्काराचा मुस्लिम सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. या घटनेतील आरोपींना फाशी द्यावी व हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणार्‍यांवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना देण्यात आले. यावेळी आबिद हुसेन, माजी नगरसेवक मुदस्सर शेख, मतीन खान, नईम सरदार, तन्वीर भाई, मोबीन शेख, एजाज शेख, शाहिद शेख, शहेबाज शेख, मुन्ना भाई, इम्रान खान, फैसल शेख, शहेबाज शेख आदि उपस्थित होते.


महिलांवर होणार्‍या अत्याचाराचे प्रमाण वाढले असून, गुन्हेगारांना प्रशासनाचा वचक राहिलेला नाही. अशा घटनांना काही घटक समर्थन करतात हे अत्यंत खेदजनक बाब आहे. अशा प्रवृत्तींना गुन्हेगार म्हणून पाहिले पाहिजे. बलात्कार करणार्‍यांचे समर्थन करणार्‍या व हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणार्‍यांवर देखील अटक करण्याची कायद्यात तरतुद होण्याची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
कठुआ येथे अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार करुन तीची हत्या करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल होवू नये यासाठी हस्तक्षेप करणार्‍या तेथील वकिलांवर कायदेशीर कारवाई व्हावी. तसेच तीच्या दफनविधीसाठी नकार देणार्‍या गावकर्‍यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. उत्तरप्रदेशात उन्नावमध्ये बलात्कार प्रकरणी आरोपीवर कारवाई होण्यासाठी तीच्या वडिलांनी उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री यांच्या निवासस्थाना बाहेर आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक करण्याऐवजी पीडित मुलीच्या वडिलांना अटक केली. त्यात त्यांचा जीव गेला आहे. या बलात्काराच्या घटनेतील आरोपींना फाशी द्यावी व या घटनेचा समर्थन करुन ते दडपण्याचा प्रयत्न करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.