Breaking News

राष्ट्रकूल स्पर्धेतील पदक विजेत्यांना राज्याकडून रोख पारितोषिके जाहीर

मुंबई, दि. 12, एप्रिल - ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरू असलेल्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत पदक विजेती कामगिरी करणार्‍या राज्यातील खेळाडूंचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी अभिनंदन केले असून या खेळाडूंसह यापुढेही पदक जिंकणार्‍या सर्व खेळाडू व त्यांच्या मार्गदर्शकांना रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येईल, अशी घोषणा केली आहे.


राज्य शासनाकडून क्रीडा संस्कृतीस प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत उज्ज्वल कामगिरी करणार्‍या खेळाडू व त्यांच्या मार्गदर्शकांना प्रोत्साहनपर बक्षिसे देऊन गौरविण्यात येते. याअंतर्गत सध्या सुरु असलेल्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धा-2018 मधील विविध पदक विजेत्या खेळाडूंना रोख पारितोषिके दिली जाणार आहेत. आतापर्यंत टेबल टेनिस या क्रीडा प्रकारात मधुरिका पाटकर, पूजा सहस्त्रबुद्धे आणि सनिल शेट्टी यांनी तर बॅडमिंटनमध्ये चिराग शेट्टी यांनी सुवर्णपदक पटकावले आहे. तसेच नेमबाजी या क्रीडा प्रकारात हीना सिद्धू यांनी 25 मीटर पिस्तुल प्रकारात सुवर्ण आणि 10 मीटर पिस्तुल प्रकारात रौप्य पदक प्राप्त केले आहे. या खेळाडूंचा तसेच या स्पर्धेत यानंतरही पदक प्राप्त करणार्‍या खेळाडू व मार्गदर्शकांचा अशा पद्धतीनेच गौरव करण्यात येणार आहे.
या निर्णयानुसार सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंना प्रत्येकी 50 लाख, रौप्य पदक विजेत्या खेळाडूंस 30 लाख तर कांस्य पदक विजेत्यांना 20 लाख रुपयांची रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच या खेळाडूंना घडविणार्‍या प्रशिक्षकांचा सुद्धा गौरव करण्यात येणार असून सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंच्या मार्गदर्शकास 12.50 लाख, रौप्य पदक प्राप्त खेळाडूंच्या मार्गदर्शकास 7.50 लाख आणि कांस्य पदक विजेत्या खेळाडूंच्या मार्गदर्शकास 5 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.