Breaking News

जळगाव साबांतील दीडशे कोटीच्या घोटाळ्याची चौकशी शक्य


मुंबई/ विशेष प्रतिनिधी :घरचे झाले थोडे व्याह्याने धाडले घोडे या ग्राम्य म्हणीची पश्‍चातापदग्ध अनुभूती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे घेत असून मुंबई पाठोपाठ जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील दीडशे कोटीच्या घोटाळा चर्चेने त्रस्त झाले आहेत. दरम्यान मुंबईच्या धर्तीवर जळगाव प्रकरणाचीही चौकशी करून अधीक्षक अभियंता सोनवणे यांच्यावर कारवाई होण्याचे संकेत मंत्रालय पातळीवरून मिळत आहेत.एकतीस मार्चअखेर संपलेल्या आर्थिक वर्षात जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागात दीडशे कोटीचा घोटाळा झाल्याचे वृत्त दै. लोकमंथनने प्रसिध्द केले होते. सार्वजनिकबांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे जळगावचे पालकमंत्री असल्याने त्यांनी पालकत्व घेतलेल्या जिल्ह्यातील त्यांच्याच खात्याचे खातेप्रमुख कोट्यावधींचा घोटाळा करीत असतील तर मुंबई साबां किंवा अन्य साबां विभागात भ्रष्टाचार झाला तर नवल नाही, अशी चर्चा गुरूवारी दिवसभर मंत्रालय परिसरात सुरू होती. मंत्रालय आणि आमदार निवासातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणाने चंद्रकांत दादा पाटील हे आधीच व्यथीत झाले आहेत. ही डोकेदुखी दुर होत नाही तोच जळगावकरांनी दादांना घरचा आहेर धाडल्याने ते अस्वस्थ झाले आहेत. लोकमंथनने प्रसिध्द केलेल्या जळगावच्या या भ्रष्टाचाराची मंत्रालय पातळीवर गंभीर दखल घेतली गेल्याने या प्रकरणाची चौकशी अटळ मानली जात आहे. मंत्रालयातील सुत्रांकडून मिळालेल्या माहीतीनुसार या दीडशे कोटीचा हिशेब लावतांना अधीक्षक अभियंता सोनवणे, कार्यकारी अभियंता पाटील, गायकवाड आणि परदेशी या चौकडीची मुंबईच्या धर्तीवर केली जाऊ शकते. या संकेतांमुळे जळगाव साबांत खळबळ उडाली आहे.