Breaking News

जामखेडला शिवसेनेचा रस्तारोको आंदोलन


जामखेड, शिवसेनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी काल दु. 12 वा. शिवसेना तालुकाप्रमुख शहाजी राजेभोसले यांच्या नेतृत्वाखाली खर्डा चौक येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. रस्ता रोको आंदोलनप्रसंगी वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख शहाजी राजेभोसले, उपप्रमुख मोहन जाधव, शिवसेना युवा नेते लक्ष्मण कानडे, अंकुश उगले, संतोष वाळुंजकर, कैलास जाधव, हिंदुराज मुळे, राहुल उगले, युवा सेना उपप्रमुख संदिप भोरे, राजू पाचारणे, शेतकरी संघटनेचे रावसाहेब खोत, भिमराव लेंडे, अप्पा मोहळकर, अप्पा कुमटकर, प्रवीण पोते, कवडगांवचे भरत जाधव, बाळासाहेब हांगे, दादा परहर, विशाल नन्नवरे, महेश नन्नवरे, हळगावचे विशाल ढवळे, खंडू कवादे, सुहास भोरे, बाळू साठे, आप्पा मोहळकरसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व शेतकर्‍यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करताना म्हणाले की, जामखेड तालुक्यात या वर्षी पावसाचे प्रमाण जास्त झाल्याने शेतकर्‍यांनी मोठया प्रमाणात खरिपातील तूर, उडीद, हरभर्‍याचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले. शेतकर्‍यांना हमी भाव मिळावा म्हणून शासनाने चालू वर्षापासून हरभरा केंद्र सुरू केले आहे. हे करत असताना जामखेड हे दळणवळणाचे ठिकाण असल्याने हरभरा खरेदी केंद्र जामखेड येथेच सुरू करण्याची आवश्यक असताना राजकीय कार्यकर्त्यांची मर्जी राखण्यासाठी हे खरेदी केंद्र जाणीवपूर्वक खर्डा येथे सुरू करण्यात आले. 

जामखेड शहराचा वाढता विस्तार व हे जामखेड तालुका मराठवाड्याच्या सरहद्दीवर असल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे. याच कारणामुळे शहरातील जागेचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्व सामान्य माणूस व्यवसायासाठी जागा घेऊ शकत नाही. त्यामुळे सुशिक्षित बेकार तरूणांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे येथे रस्तालगत अनेक शासकीय शासनाच्या मालकीच्या जागेमध्ये हे सुशिक्षित तरूण व्यवसाय करत होते. परंतू प्रशासनाने अतिक्रमणच्या नावाखाली शहरातील काही भागातील अतिक्रमण काढलेली आहेत. त्यामुळे हे तरूण रस्त्यावर आले आहेत. या गोष्टींचा विचार करता शासनाच्या मालकीच्या नवीन बसस्थानक परिसर, जुने बस्थानक परिसर, खर्डा चौक येथील जिल्हा परिषदच्या या जागेमध्ये शॉपिंग सेंटर उभारून सुशिक्षित बेकार तरूणांचे पुनर्वसन करण्यात यावे. तसेच सतत खंडीत होणारा विज पुरवठा व कमी दाबाने मिळणारा विज पुरवठा यामुळे शेतकर्‍याची पिके पाणी असताना विजेच्या अभावी जळून गेली आहेत. याचा विचार करता सततचे होणारे भारनियमन कमी करण्यात यावे, अशा विविध मागण्यासंदर्भात रास्तारोको आंदोलनादरम्यान करण्यात आल्या. हे आंदोलन सुमारे एक तास सुरू होते. यानंतर नायब तहसीलदार रणदिवे यांना निवेदन देऊन आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी तहसिलदार यांनी सांगितले की, मी तुमचे निवेदन वर पाठवतो रस्ता रोको आंदोलनप्रसंगी जामखेड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नितीन पगार यांनी नगरहून मोठा पोलीस फौजफाटा मागिवला होता.

जामखेडचे आमदार व पालकमंत्री राम शिंदे यांचेमुळे जामखेड तालुक्यात अधिकारी थांबत नाहीत. त्यामुळे प्रभारीज आहे. जामखेडचे अतिक्रमण हटविल्याने त्या गोरगरीब जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे. त्या टपरीधारकांना शॉपिंग सेंटर देण्यात यावे. कुकडीचे पाणी जामखेड तालुक्याला आणावे. तसेच जामखेडला एक महिन्याच्या आत कायमस्वरूपी अधिकार्‍यांची नेमणूक नाही झाली तर, कार्यालयास टाळे ठोकले जातील असा इशारा दिला आहे.