पंतप्रधान मोदी यांना विरोधकांनी दाखवले काळे झेंडे
चेन्नई - पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी चेन्नईमध्ये पोहोचले आहेत. कावेरी नदी पाणी वाटपाच्या मुद्यावर विरोधकांनी घोषित केलेल्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी गुरूवारीशहरात दाखल झाले आहेत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वाम यांनी पंतप्रधानांचे विमानतळावर स्वागत केले. कावेरी नदी जल व्यवस्थापन मंडळ स्थापन करण्याबरोबरच राज्याच्या आणखी काही दीर्घ काळ प्रलंबित असलेल्या मागण्यांचे निवेदन यावेळी पंतप्रधानांना सादर करण्यात आले. पंतप्रधान मोदी यांच्या भेटीच्या निषेधार्थ राज्याच्या विविध भागांमध्ये प्रमुख विरोधी पक्ष द्रविड मुन्नेत्र कळघमच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी काळे झेंडे लावले होते. डीएमके कार्यकारिणीचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांच्या आदेशावरुन शहरातील पक्षाचे मुख्यालय आणि डीएमके अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांच्या गोपालपुरम येथील निवासस्थानी काळे झेंडे लावण्यात आले होते. कावेरी नदी जल व्यवस्थापन मंडळ स्थापन न करून पंतप्रधानांनी तामिळनाडूवर फारच अन्याय केला आहे. त्यामुळे लोकशाही पद्धतीने आम्ही त्यांचा निषेध करत आहोत, असे द्रमुकचे मुख्यालय पदाधिकारी म्हणाले. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसोबतच, राज्यपाल बनवारिलाल पुरोहित, केंद्रीय मंत्री पोन राधाकृष्णन आणि राज्यातील इतर वरिष्ठ मान्यवरांनी सकाळी चेन्नई विमानतळावर मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर मोदी थिरुविदांतई येथे डिफेन्स एक्स्पोच्या प्रदर्शनाला भेट दिली.