जामगावमधील पथदिव्यांचा प्रश्न चिघळणार
जामगाव येथे १४ व्या वित्त आयोगाचा निधी व निवडणूक काळात बसविलेले पथदिवे व हायमॅक्स दिव्यांच्या निधीतून लाखो रूपये खर्चून हे दिवे बसविण्यात आले. रामेश्वर मंदीर, राम मंदीर, गहिनीनाथ बाबा मंदिर व बांगरवाडीतील हनुमान मंदीर येथील हायमॅक्स दिवे बंद असून वारंवार मागणी करूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप माजी सरपंच विजय बांगर यांनी केला आहे. ग्रामपंचायत सदस्य सुनिल शिंदे यांनी त्यांच्या वार्डातील पथदिवे गेल्या पंधरा दिवसांपासून बंद असल्याचे समोर आणले. तीन वर्ष वॉरंटी असलेला पथदिवे अडीच महिन्यांतच कसे बंद पडले? असा सवाल माजी सरपंच बांगर व ग्रा.पं. सदस्य सुनिल शिंदे यांनी उपस्थित केला. या कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपाचे अनुसुचित जाती-जमाती तालुकाध्यक्ष तथा जामगावचे माजी उपसरपंच वसंत मुरकुटे यांनी केला आहे.
बांगरवाडी येथे माजी सरपंच बांगर यांनी स्वखर्चातून पथदिवे बंद बसविले परंतु त्यानंतर याच्या दुरूस्तीकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. ग्रामस्थांच्या अडचणी सोडविताना राजकारण केले जात असल्याचा आरोप माजी सरपंच विजय बांगर यांनी केला आहे. याबाबत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.