Breaking News

पाण्याची बचत हीच पाणी निर्मिती: तांबे यावर्षीपासून जलसाक्षरता अभियान

संगमनेर प्रतिनिधी  - पाणी हेच जीवन असून पाण्याच्या दुर्भिक्षामुळे सजीव सृष्टीला मोठा धोका निर्माण झाला आहे. हवामानाचा लहरीपणा, दुष्काळ यासह विविध समस्यांवर मात करण्यासाठी देशपातळीवर पाणी वाचविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. यावर्षीपासून तालुक्यात जलसाक्षरता अभियान राबविणार आहोत. एकमात्र नक्की, की सध्याची पाणी बचत हीच भविष्यातील पाणी निर्मिती ठरणार आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी व्यक्त केले. येथील सह्याद्री विद्यालयात जागतिक जलदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘पाणी वाचवा’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी रजिस्ट्रार बाबुराव गवांदे, प्राचार्य बी. के. शिंदे, श्रीमती नम्रता पवार, अशोक गुंजाळ, नामदेव कहांडळ, सचिन गुंजाळ, रवी सोनवणे, श्रीमती पुष्पा कासार, श्रीमती मंगला देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना पाणी बचतीची शपथ देण्यात आली.

तांबे म्हणाल्या, निसर्गनिर्मित पाणी, हवा यांचे मानवाला महत्व कळत नाही. परंतु त्याचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. पाण्याच्या दुर्भिक्षेमुळे दुष्काळी भागात अगदी हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागते. वाढती लोकसंख्या, पाण्याचा अपव्यय, नियोजनाचा अभाव, पाण्याचा अतिवापर याबाबत सर्व स्तरावर जाणीव जागृती होणे महत्वाचे आहे. पर्यावरण संवर्धनाबरोबर पाणी संवर्धन होण्यासाठी यावर्षीपासून तालुक्यात व शहरात आ. बाळासाहेब थोरात व आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जलसाक्षरता अभियान राबविण्यात येणार आहे. याद्वारे गावोगावी विशेषतः महिलांमध्ये पाणी बचतीचे महत्व याबाबत जागृती केली जाणार आहे. यात पथनाट्य, चित्रकला स्पर्धा, विविध गाणी, शालेय विदयार्थ्यांमध्ये प्रत्येक कुटूंबात पाणी बचतीसाठी स्पर्धा, पावसाळ्याात पावसाचे अडविणे, पाणी बँक, जलदिंडी या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

जलदिनानिमीत्त महिलांनी गरजेपुरते पाणी वापरणे गरजेचे आहे. धुणीभांडी करतांना साबणाचा कमी वापर करावा. म्हणजे पाणी कमी लागेल. तसेच वापरलेल्या पाण्याचा पुनर्रवापर केला तर नक्कीच पाणी बचतीसाठी मोठे काम होईल. यावेळी नगराध्यक्षा तांबे यांनी विविध शाळांच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.