Breaking News

बहुजननामा - ब्राह्मण-ब्राह्मणेतर द्वेष व प्रज्ञा शिल करूणामय बळीराज्य...!

बहुजनांनो.... ! 
आज रमेश भीडे नावाच्या एका अभ्यासू फेसबुकीची पोस्ट वाचण्यात आली. अत्यंत अभ्यासपूर्ण व संयमाने रमेश भीडेंनी आपल्या ब्राह्मण महापुरूषांवर होत असलल्या अन्याला वाचा फोडण्याचे काम केलेले आहे. प्रत्येक जातीच्या विद्वानाने आपापल्या जातीचे दुःख वेशीवर टांगावे, असे तात्यासाहेबही सांगून गेलेच आहेत. रमेश भीडेंसारख्या विद्वानांनी तेच केले तर त्यात त्यांना दोष देण्यात अर्थ नाही. खरे म्हणजे ‘जात’ ही संकल्पना कोणाचे भले करण्यासाठी निर्माण झाली नाही. तिचा पायाच मुळी द्वेषावर उभा आहे. ख्रिश्‍चन सारख्या मिशनरी धर्मांनी दुसर्या धर्मातील लोकांचे भले करण्यासाठी शाळा, दवाखाने काढलेत. मुस्लीम धर्मानेही हिंदू धर्मातील जातीय गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी क ाहींना मुस्लीम धर्मात सामावून घेतले. तसे जातीव्यवस्थेत वा ब्राह्मणी-हिंदू धर्मात होणे शक्य नाही. बाबासाहेब ठाम पुराव्यासह सांगून गेलेत की, हिंदू हे मिशनरी होऊ शकत नाहीत. याचे साधे कारण हे आहे की, कोणतीही एक जात दुसर्याव जातींचा द्वेष करण्यातूनच निर्माण झाली आहे. जातीव्यवस्था ही उतरंडीची असल्याने द्वेषाच्या प्रमाणालाही उतरंड वा चढण असते. म्हणजे सर्वात वरच्या स्थानावर बसलेल्या ब्राह्मण जातीला खालच्या सर्वच जातींचा द्वेष करावा लागतो, म्हणजे द्वेषाचे भरगच्च असे कोठारच सोबत घेऊन फिरावे लागते. जातीव्यवस्थेच्या उतरंडीत सर्वात खाली असलेल्या ‘अस्पृश्य’ जातींना आपसातच द्वेष करावा लागतो. कारण द्वेष करण्यासाठी आणखीन खाली कोणतीच जात नाही, मग द्वेष करणार तरी कोणाचा? 
रमेश भीडे यांची तक्रार वाचून आश्‍चर्य फक्त याचेच वाटते की, त्यांनी या जाती-द्वेषाच्या उतरंडी-चढणीचा अभ्यास न करताच ‘ब्राह्मण-ब्राह्मणेतर’ द्वेषाबद्दल लिहिलेले आहे. जातीव्यवस्थेच्या भरभराटीच्या काळात ब्राह्मण-ब्राह्मणेतर द्वेषाची उतरंड ही वरून खाली होती, आज ही उतरंड ‘चढण’ बनून खालून वर म्हणजे उल्टी झालेली आहे एवढेच! द्वेषाची उतरंड उल्टी झालेली आहे याचा अर्थ आता जातीव्यवस्थेची ‘उल्टी गिणती’ सुरू झाली आहे. पण असा अभ्यास रमेश भीडेच काय पण ब्राह्मणातील क्रांतीकारक म्हणविणारे श्रीपाद अमृत डांगे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्रींसारखेही करू शकलेले नाहीत. या विद्वानांनी तर स्पष्टपणे लिहून ठेवले आहे कि, महाराष्ट्रात ‘जोतीराव फुले’ हेच ब्राह्मण- ब्राह्मणेतर द्वेषाचे जनक आहेत. अर्थात हा काही त्यांनी मांडलेला ‘सिद्धांत’ नाही. सिद्धांत असता तर त्याला ऐतिहासिक विश्‍लेषणाचा आधार वा संदर्भ दिला असता. डांगे वगैरेंनी जाताजाता मारलेला तो ‘शेरा’ होता. शेर्यासला कोणतीही कारणमिमांसा नसते. शिवाय शेरा मारण्याचा अधिकार वरिष्ठालाच असतो. कनिष्ठाला तो कितीही चुकीचा वाटत असला तर ‘जाब’ कोणाला विचारणार?
इंग्रजांनी टिळकांना ‘भारतीय असंतोषाचे जनक’ अशी शिवी देऊन तुरुंगात टाकले. स्वातंत्र्य चळवळीच्या शिलेदारांना ती शिवी ‘पद्वी’ वाटते. परंतू ब्राह्मण-ब्राह्मणेतर द्वेषाचे जनक अशी शिवी जर ब्राह्मण विद्वान तात्यासाहेबांना देत असतील तर ती गौरवास्पद वगैरे मानण्याचे काम ब्राह्मणेतर करणार नाहीत. मात्र या शिवीचे विष्लेषण जरूर करतील. बाबासाहेबांनी जातीव्यवस्थेच्या निर्मितीचे रहस्य उलगडतांना स्पष्ट केले आहे की, सर्वात आधी ब्राह्मण वर्गाने स्वतःला बंदिस्त करून ‘जात’ निर्माण केली. म्हणजे द्वेषाचा पहिला दगड पायाभरणीत टाकण्याचे महापुण्य ब्राह्मणांनीच केले. 21 वेळा पृथ्वी निःक्षत्रिय करून जगभर द्वेषाचा भंडाराच उधळला. त्यानंतर जसजसे नवे वर्ण वा जाती उतरत्या भांजणीत निर्माण होत गेल्या तसतसे चढत्या भांजणीचा द्वेष ब्राह्मणांना करावाच लागला. कारण इमारतच द्वेषाच्या पायावर उभी केली गेली. चूकून एखाद्या जातीबद्दल प्रेम निर्माण झाले तर इमारतीचा डोलाराच कोसळायचा!
हेच काम तात्यासाहेबांनी व बाबासाहेबांनी केले. चूकून नाही तर जाणीवपुर्वक त्यांनी ‘जाती जातींमध्ये भाईचारा’ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. एकूणच द्वेषाच्या पायावर उभ्या असलेल्या इमारतीला सुरूंग लावण्यासाठी जातीअंताचे तत्वज्ञान निर्माण केले व क्रांतीकारक कृतीकार्यक्रमही दिला. ‘’भिल्ल महार ब्राह्मणाशी! धरावे पोटाशी!! जोती म्हणे.....’’ असा सिद्धांत मांडून ब्राह्मणांवरही प्रेम करण्याचा संदेश दिला. बाबासाहेबांनी मनुस्मृतीला ‘काडी’ लावण्याचे काम एका ब्राह्मणाकडून करवून घेतले. याचा अर्थ ब्राह्मण आमचे मित्रच आहेत, असा संदेश त्यांना द्यायचा होता. शाहू महाराज ‘राजे’ असूनही त्यांनी कधीच सूडबुद्धीने ब्राह्मणांना दंडित केले नाही. त्यांच्या जातीअंताच्या धोरणावर जेव्हा जेव्हा ब्राह्मण आडवे पडलेत तेव्हा तेव्हा त्यांनी त्यांचे वैचारिक प्रबोधनच केले. एकाला तर ते चक्क घोड्याच्या पागेत घेऊन गेलेत. वकील असलेल्या ब्राह्मण विद्वानाला मानवी सिद्धांत समजावून सांगतांना घोड्याचा वापर करावा लागतो. यावरून जातीव्यवस्था ही किती रानटी आहे, याची कल्पना यायला हवी. आणी तरीही ‘तीला’ निर्माण करणार्याांना आजही ‘सुसंस्कृत’ समजले जाते. 
तात्यासाहेब, बाबासाहेब व शाहू महाराज यांनी ब्राह्मणांसकट सर्वच जातींवर प्रेम करायला शिकविले. कारण जातीव्यवस्था नष्ट करायची तर द्वेषाचा पाया मुळातून उखडून फेकावा लागेल. परंतू त्यासाठी काही व्यापकता, उदारता, त्याग, बलिदान वगैरे ओघानेच येते. पण समाजात असाही एक वर्ग असतो की त्याला असे काही न करता शॉर्टकटने बरेच काही मिळवायचे असते. महापुरूषांच्या क्रांतिकारक सिद्धांतांना सुधारणावादी बनवून मुरळ घालतात, सोपेकरणाच्या नावाखाली विकृत करतात, आपल्या सोयीचे तेवढे स्विक ारतात व गैरसोयिचे तेवढे गाडून टाकण्याचा प्रयत्न करतात. अशा स्वार्थी वर्गाला ओळखून बाजूला ठेवले तरच तात्यासाहेब, बाबासाहेब व शाहूराजेंसारख्या असंख्य महापुरूषांचे स्वप्न असलेले ‘प्रज्ञा शिल करूणामय’ बळीराज्य साकारणार आहे.
जयजोती! जयभीम!!