Breaking News

गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी एकजण अटकेत

बंगळुरु : ज्येष्ठ पत्रकार आणि समाजसेविका गौरी लंकेश हत्येप्रकरणी एसआयटीला मोठे यश मिळाले आहे. या हत्येच्या घटनेला पाच महिन्याचा काळ लोटल्यानंतर 37 वर्षीय व्यापारी केटी नवीन कुमारला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. केटी कुमारला 18 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आल्याचे, तपास यंत्रणांनी कोर्टात सांगितले. अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी सुरुवातीपासूनच केटी नवीन कुमारवर तपास यंत्रणांचा संशय होता. आरोपीच्या मित्रांकडूनही याबाबतचे धागेदोरे मिळाले. त्यावरुन नवीन कुमारबाबतचा तपास यंत्रणांचा संशय बळावला. त्यावरुन कुमारला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, पोलिसांनी नवीन कुमारच्या पोलीस कोठडीत मुदतवाढ मिळावी, अशी मागणी केली आहे. कारण, त्याच्या चौकशीतून अजून काही महत्त्वाची माहिती मिळण्याची पोलिसांना आशा आहे. त्यावरुन कोर्टानेही नवीन कुमारच्या पोलीस कोठडीत आठ दिवसांची वाढ केली आहे. 5 सप्टेंबर 2017 रोजी गौरी लंकेश यांची त्यांच्याच घराबाहेर हत्या झाली होती. त्यांच्यावर सात गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर संपूर्ण देशभरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सर्व साहित्यिकांनीही याचा तीव्र शब्दात निषेध केला होता.