Breaking News

मेघालयात सत्ता स्थापनेचा तिढा काँग्रेसकडून सत्ता स्थापनाचा दावा ; भाजपकडून मोर्चेबांधणी

शिलाँग - मेघालय विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने त्रिशंकू स्थिती निर्माण झाली. त्यामुळे सत्ता स्थापनेचा तिढा कायम असला तरी, काँग्रेसने राज्यपाल गंगा प्रसाद यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. तर दुसरीकडे भाजपने सत्तास्थापनेसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी कोणाचे प्रयत्न यशस्वी होतात आणि मेघालयात काँग्रेस की भाजपा सत्तेत येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. काँग्रेसच्या तीन नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली आणि सत्ता स्थापनेचा दावा केला. यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ, अहमद पटेल आणि सी. पी. जोशी यांचा समावेश होता. आम्ही राज्यपालांना भेटलो आणि मोठा पक्ष असल्याने परंपरेप्रमाणे पहिल्यांदा सत्तास्थापनेचा दावा केला, असे माजी केंद्रीय मंत्री कमलनाथ यांनी सांगितले.

मात्र, दुसरीकडे रविवारी दुपारी युडीपीने एनपीपी पक्षाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. एनपीपीने 19 जागांवर विजय मिळवला आहे. तसेच भाजपनेही त्यांना पाठींबा दर्शवला आहे. त्यामुळे सत्तेसाठी हे देखील समीकरण जुळत असल्यामुळे सत्ता स्थापन करण्याचा तिढा कसा सुटतो, याकडे अनेकांचे लक्ष आहे. 
सत्ता स्थापनेसाठी हालचाली करणार्‍या भाजपने जनमताचा आदर करावा असे मुख्यमंत्री मुकूल संगमा यांनी म्हटले आहे. मुकूल संगमा यांनी समविचारी घटकांसोबत चर्चा करुन सत्ता स्थापनेचा विश्‍वास व्यक्त केला. भाजपच्या सत्त्ता स्थापनेच्या मनसुब्यांना लक्ष्य करताना निवडणुकीत 2 जागा जिंकणारा पक्ष राज्यात सत्ता कशी स्थापन करु शकतो असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एकूण 60 सभासदांच्या विधानसभेत 21 जागांवर विजय मिळवून काँग्रेस हा एकमेव मोठा पक्ष ठरला आहे. संपूर्ण बहुमत मिळवण्यासाठी मात्र काँग्रेसला 10 जागांची आवश्यकता आहे. तर, भाजप प्रादेशिक बिगर काँग्रेस पक्षांशी आघाडी करण्याच्या तयारीत आहे. एनडीचा घटक पक्ष असलेल्या एनपीपीने भाजपशी संधान साधल्यास मेघालयात कमळ फुलू शकते.