मिरजगाव बसस्थानक इमारत निकृष्ट दर्जाचे; चौकशीची ग्रामस्थांची मागणी
येथील नवीन बसस्थानकाचे काम अतिशय धिम्या गतीने तसेच निकृष्ठ दर्जाचे सुरू असुन या कामाची चौकशी करुन त्यात सुधारणा करावी अशी मागणी कामना युवा प्रतिष्ठाण मिरजगावचे कार्याध्यक्ष किरण चुंभळकर व संचालक अजय मोरे यांनी केली आहे. मिरजगाव हे नगर-सोलापूर महामार्गावरील मोठी बाजारपेठ असणारे गाव असुन येथील बसस्थानकाची मोठी दुरावस्था झाली होती. कामना युवा प्रतिष्ठाण गेली अनेक वर्षांपासुन मिरजगाव बसस्थानकाची नवीन इमारत होण्यासाठी प्रयत्नशिल होते. या संदर्भात परिवहन मंत्र्यांशी, महामंडळाशी अनेक वेळा पत्रव्यवहार केला आहे. पालकमंत्री राम शिंदे यांच्या प्रयत्नाने त्यास यश येऊन नवीन बसस्थानकाची इमारत मंजूर झाली.
यासाठी 77 लाख रुपये मंजूर झाल्याचे समजते. नगर-सोलापूर हाआता राष्ट्रीय महामार्ग झाला असून त्याचे काम थोड्याच दिवसांत सुरु होत आहे. त्यामुळे त्याच तोडीची बसस्थानकाची इमारत होणे गरजेचे आहे. मिरजगाव ही मोठी बाजारपेठ असणारे गाव असल्याने ही इमारत मिरजगावच्या वैभवात भर घालणारी असेल. तेंव्हा या बसस्थानकाचे काम चांगल्या दर्जाचे व टिकावू व्हावे, ही मिरजगावच्या जनतेची भावना आहे. यासाठी संबंधित अधिकार्यांनी या कामाच्या दर्जाबाबत कसलीही तडजोड करु नये ही अपेक्षा आहे. परंतू ठेकेदार कसे काम करत आहे.
याकडे कोणताच अधिकारी पाहणी करण्यासाठी येत नसल्याचे दिसून येते.प्लिथं लेवलपर्यंत हे काम सुरू असून पाण्याचा वापर पाहिजे त्या प्रमाणात केला जात नाही. वाळुही सुमार दर्जाची वापरली जात आहे. विटा निकृष्ट दर्जाच्या आहेत. त्यामुळे हे काम चांगले होईल की नाही या बाबत शंका असुन ठकेदाराने हे काम उत्तम दर्जाचे करावे अशी मागणी कामना युवा प्रतिष्ठाणचे कार्याध्यक्ष किरण चुंभळकर, सुधिर आखाडे, अजय मोरे यांच्यासह ग्रामस्थांनी केली. या कामात सुधारणा न झाल्यास परिवहन मंत्री, पालकमंत्री यांचेकडे लेखी तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगीतले. गेली एक महीन्यापासुन काम बंद असुन ते तातडीने सुरु करावे अशी मागणी डॉ. गोरे यांनी केलीआहे.