Breaking News

कर्जत-जामखेडमधील गावांना कुकडीचे पाणी मिळणार


कुकडी प्रकल्पाच्या सुधारित प्रकल्प अहवालानुसार कर्जत-जामखेड मतदारसंघातील गावांना कुकडीचे पाणी उपलब्ध करुन देण्याबाबतचा निर्णय राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी घेतला आहे. या निर्णयाने खर्‍या अर्थाने जामखेड तालुक्याला कुकडीचे पाणी मिळणार आहे. तालुक्यातील सीना नदीवरील जवळा, दिघी (आगी), पाटेवाडी या बंधार्‍यांचा कुकडी प्रकल्प लाभक्षेत्रात समावेश करण्यात आल्याने तालुक्यातील शेतकर्‍यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. तालुक्याच्या दृष्टीने हा ऐतिहासिक निर्णय मानला जात आहे.

पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या पुढाकाराने गुरूवारी ( दि. 22) जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी बैठक झाली. यावेळी जामखेड तालुक्यातील चौंडी, दिघी, जवळा बंधारे, पाटेवाडीसह इतर बंधार्‍यांसाठी कुकडीचे पाणी उपलब्ध करुन देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
 
जलसंपदामंत्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी वरील बंधार्‍यांचा समावेश कुकडी लाभक्षेत्रात करण्याची आग्रही मागणी केली होती. कर्जत-जामखेड या दुष्काळी तालुक्यांच्या दृष्टीने या कामांचे महत्व अधिक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार, याअनुषंगाने कार्यवाहीच्या सूचना महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांना शासनाने दिल्या आहेत. 

कुकडी डावा कालवा कर्जत शाखा कालव्याचे निमगाव चारी व पुढे अंदाजे 9 किलोमीटर नाला व 9 किमी नदी पात्रामधून नैसर्गिक प्रवाह मार्गामधून चौंडी, दिघी व जवळा बंधार्‍यामध्ये पाणी सोडण्यास यावेळी मान्यता देण्यात आली. या पाणीवापराची तरतूद कुकडी प्रकल्पाच्या प्रस्तावित सुधारित प्रशासकीय अहवालामध्ये घेण्याचे निर्देशही महामंडळाला देण्यात आले आहेत.अनेक वर्षांपासून रखडलेल्या या कामांना आता पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्या पुढाकारामुळे चालना मिळाली आहे. बैठकीनंतर तात्काळ शासनाने संबंधित महामंडळाला आदेश दिल्याने ही प्रक्रिया आता जलदगतीने सुरु होणार आहे.
 
कुकडीचे पाणी जामखेड तालुक्याला मिळावे ही मागणी गेली 40 वर्षापासून सातत्याने केली जात होती. या पार्श्‍वभूमीवर तालुक्यात विविध पक्षांनी वेळोवेळी आंदोलने केली. मात्र तत्कालिन सरकारकडून याप्रश्री जामखेड तालुक्याला उपेक्षा वाट्याला आली. सन 1998 साली भाजपा शिवसेना सरकारमधील तत्कालिन पाटबंधारे मंत्री एकनाथ खडसे यांनी कुकडीचे पाणी सीना नदीवरील चोंडी बंधार्‍यात सोडण्याचा निर्णय घेतला होता.

विशेष म्हणजे त्यावेळी केवळ चोंडी विकास प्रकल्पाचे सदस्य म्हणून कार्यरत असलेले प्रा. राम शिंदे यांनी याप्रश्री
चोंडी आणि परिसरातील शेतकर्‍यांचे शिष्टमंडळ तत्कालिन ग्रामविकासमंत्री अण्णा डांगे यांच्या माध्यमातून मुंबईला गेले होते. दरम्यानच्या काळात याच चोंडी बंधार्‍यात कुकडीचे पाणी सोडावे या मागणीसाठी 27 नोव्हेंबर 2012 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रा. राम शिंदे यांना आत्मदहन करावे लागले होते. आज मंत्री म्हणून काम करताना मंत्री शिंदे यांनी कुकडी प्रकल्पाला सुधारित मान्यता घेताना मतदारसंघातील चोंडी बरोबरच जवळा, दिघी(आगी), पाटेवाडी या बंधार्‍यांचा कुकडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात समावेश केला आहे. या निर्णयाने गेल्या अनेक वर्षाची मागणी पुर्ण झाल्याचे समाधान शेतकर्‍यांमधून व्यक्त होत आहे.