Breaking News

तुकाईचारीस मंजूरी


कर्जत तालुक्यातील गाजत असलेल्या तुकाईचारीस मुंबई येथील बैठकीत मंजुरी मिळाल्याच्या माहितीने कर्जतसह तालुक्यात भाजप समर्थकांनी फटाके उडवून स्वागत केले. या प्रश्‍नांसाठी गेली एक वर्षांपासून कर्जत येथे उपोषण करणारे ज्येष्ठ नागरिक बाळासाहेब सूर्यवंशी यांनी मात्र नाराजी व्यक्त करत पुन्हा फसवणूक केली असल्याची भावना पत्रकारांपुढे व्यक्त केली.

कर्जत तालुक्यातील 21 गावासाठी वरदान ठरणार्‍या तुकाईचारीसाठी गुरवपींप्री येथील 74 वर्षीय ज्येष्ठ नागरिक बाळासाहेब सूर्यवंशी यांनी एक वर्षांपासून कर्जत तहसील कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन सुरू ठेवले आहे. या प्रश्‍नावर चर्चा करण्यासाठी काल रोजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे निवासस्थानी आज ना. प्रा. राम शिंदे यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीस तालुक्यातील भाजपासेनेचे अनेक नेते उपस्थित होते. यावेळी कुकडी प्रकल्पाच्या तिसर्‍या सुधारीत मंजुरीस आज मान्यता देण्यात आली.

यामध्ये तुकाई चारीसह चौंडी, दिघी, जवळा बंधारे, पाटेवाडीसह इतर बंधार्‍यांसाठी पाणी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला. तुकाई उपसा सिंचन योजना आणि बिटकेवाडी पाझर तलावातील सध्याच्या पाझर तलावाद्वारे अंदाजे 450 हेक्टर क्षेत्राचे सिंचन स्थिरीकरण करण्यासाठी 0.100 दशलक्ष घनफूट पाणी प्रस्तावित करण्यात आले, याशिवाय कुकडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यामधून भोसे खिंड बोगद्याद्वारे सीना मध्यम प्रकल्पामध्ये 225 दशलक्ष घनफूट पाणी देण्यास मान्यता देण्यात आली.