युवतींनी स्वकर्तृत्वावर पुढे येण्याची गरज उपाध्यक्षा - राजश्री घुले
स्पर्धेच्या युगात युवतींनी स्वकर्तृत्वावर उच्च शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेद्वारे वरिष्ठ पदावर काम करावे असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा राजश्रीताई घुले यांनी केले. मारूतरावजी घुले पाटील महाविद्यालय नागापूर व सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांचे संयुक्त विद्यमाने निर्भय कन्या व महिला सबलीकरण अभियान कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून स्मिता पानसरे, प्राचार्य डॉ. टी. एन. वराट उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना घुले यांनी सांगितले की, आज धावपळीच्या युगात महिला ही असुरक्षित असलेली दिसून येते. समाजातील नैतिकता घसरत चालल्याने आपण बघतो कोपर्डीसारख्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होताना दिसते. एक स्त्री शिकली तर एक कुटुंब शिकते.या निमित्ताने सर्व युवतींना सांगू इच्छिते की चूल आणि मूल या फेर्यात अडकून राहण्याचे दिवस केंव्हाच संपले आहेत. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे शिका, संघटित व्हा व हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करा हाच विचार घेऊन आपणा सर्वांना पुढे जायचे अशी मनाशी खूणगाठ आपण बांधावी भविष्यकाळात कोणतेही करियर निवडा, त्यात यशस्वी व्हा असे आवाहन विद्यार्थिनींना त्यांनी यावेळी केले. यावेळी संजय भुसारी, प्रा. एस. व्ही. मरकड, प्रा. अविनाश आहेर आदींसह विद्यार्थी प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य टी. एन. वराट यांनी केले. सुत्रसंचलन प्रा.डॅा. के. आर. पिसाळ यांनी तर आभार प्रा. राजेश नेटके यांनी मानले.