Breaking News

त्रिपुरा, नागालँडमध्ये भाजपचा झेंडा तर मेघालयात काँगे्रसची आघाडी

नवी दिल्ली : त्रिपूरा, नागालँड व मेघालय या तीन राज्यात झालेल्या विधानसभा निवडणूकांची मतमोजणी शनिवारी पार पडली असून, त्रिपूरा व नागालँड या राज्यात भाजपाने प्रथमच सत्ता काबीज करण्यात यश मिळविले असून, मेघालयमध्ये त्रिशंकु परिस्थिती असून, काँगे्रसच सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. 
त्रिपुरामध्ये भाजप आणि मित्रपक्ष 42 तर डावे 15 जागांवर आघाडीवर आहेत. तर नागालँडमध्ये भाजप आणि मित्रपक्षांना 30 तर एनपीएफला 22 जागांवर आघाडी आहे. मेघालयमध्ये मात्र काँग्रेस 23 एनडीए 21 जागांवर आघाडीवर आहे. एकंदर आता ईशान्य भारतातल्या 5 राज्यात आता भाजपची सत्ता स्थापन झाली आहे. तर 56 जागांवर उमेदवार लढवूनही काँग्रेसला त्रिपुरात भोपळाही फोडता आलेला नाही. माणिक सरकार यांची त्रिपुरातील भक्कम राजवट कोसळली आहे. एकेकाळी पश्‍चिम बंगास,त्रिपुरा आणि केरळ या तिन्ही राज्यात सत्ता असलेल्या डाव्यांची सत्ता आता फक्त दक्षिण भारतातील केरळपुरतीच मर्यादित राहिली आहे. तर भाजपच्या खात्यात देशातील 21 राज्य जमा झाली आहे.नागालँडमध्येही एनपीएफची सत्ता कोसळली आहे. मेघालयमध्ये काँग्रेसने गड राखला असला तरी त्यांच्या जागा मात्र कमी झाल्याचे दिसून येत आहे.
त्रिपुरामध्ये सीपीएमसाठी हा मोठा धक्का मानला जात असून, आता त्रिपुरामध्ये मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा रंगू लागली आहे. भाजपचे त्रिपुरा अध्यक्ष विप्लव देव यांचे नाव सध्या मुख्यमंत्रीपदासाठी आघाडीवर आहे. भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येईल. नागालँडमध्ये आत्तापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार भाजपा आणि एनडीपीपीने 11 जागी विजय मिळवला आहे तर 17 जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे नागालँडमध्येही भाजपाला बहुमत मिळणार हे उघड आहे. ईशान्येकडील दोन राज्ये काबीज करण्यात भाजपाला यश आले आहे. काँग्रेसला नागालँडमध्येही एकही जागा मिळवता आलेली नाही. तर कुठेही आघाडीही घेता आलेली नाही.
मेघालयमध्ये कोण सत्ता स्थापन करणार याबाबत अद्याप चित्र अस्पष्ट आहे. त्यासाठीच काँग्रेसने अपक्ष उमेदवारांशी बोलणी करण्यासाठी अहमद पटेल आणि मुकूल वासनिक आणि कमलनाथ यांना मेघालयला पाठवण्यात आले आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, वरिष्ठ काँग्रेस नेते अहमद पटेल आणि कमलनाथ मेघालयमध्ये सत्ता स्थापन व्हावी यासाठी शनिवारी सकाळीच शिलाँगला रवाना झाले आहेत. ते अपक्ष आमदारांशी चर्चा करुन सत्ता स्थापन करु शकतात. मेघालयमध्ये सध्या काँग्रेसचे सरकार असून येथील बर्‍याच ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. गोवा आणि मणिपूरमध्ये झालेल्या चुका लक्षात घेत आता काँग्रेस या ठिकाणी झटपट पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. गोवा आणि मणिपूरमध्ये सर्वात मोठा पक्ष असूनही काँग्रेसला इथे सत्ता स्थापन करता आली नाही. या दोन्ही ठिकाणी भाजपने अपक्ष आणि स्थानिक पक्षांसोबत युती करुन सत्ता स्थापन केली. त्यामुळे आता काँग्रेसने पुन्हा तिच चूक न करण्याचे ठरवत आपल्या ज्येष्ठ नेत्यांना मेघालयमध्ये पाठवले आहे.