Breaking News

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाई चौधरी यांचे नाव देणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत जाहीर केले.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अर्थसंकल्पीय अनुदानावरील चर्चेदरम्यान उपस्थित करण्यात आलेल्या मागणीच्या अनुषंगाने त्यांनी हे जाहीर केले. यावेळी या मागण्यांच्या चर्चेस उत्तर देताना शालेय शिक्षण व क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी माहिती दिली की, पुणे येथील छत्रपती शिवाजी क्रीडा संकुल येथे क्रीडा विद्यापीठाच्या जागेची आखणी करण्याचे काम सुरू असून येथे जागा उपलब्ध झाल्यास ऑलिंपिक भवन उभारण्यात येईल. जागेबाबत अडचण आल्यास पुण्यातच अन्य ठिकाणी ऑलिंपिक भवन उभारण्यात येईल. तसेच राज्याची क्रीडा संहिता तयार करण्यात येईल.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अर्थसंकल्पीय अनुदानावरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. त्यांनी पुढे माहिती दिली, राज्य शासनाने खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी रिओ ऑलिंपिक मधील खेळाडुंना रोख बक्षिसे दिली. यापूर्वी राष्ट्रीय स्पर्धेतील खेळाडुंना बक्षिसांची रक्कम देण्यात आली होती. मात्र त्यासाठीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला नव्हता. आता राष्ट्रीय स्पर्धेतील खेळाडूंना बक्षिसांची रक्कम देण्यासाठी शासन निर्णय काढण्यात आला असून यापुढे या खेळाडुंना तत्काळ बक्षिसे देण्यात येतील.