राज्यात तीन नवीन पोलीस आयुक्तालये स्थापन करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गृह विभागाच्या अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यांच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने श्री. फडणवीस यांनी ही माहिती दिली. ते पुढे म्हणाले, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी शासनाकडे अहवाल आला आहे. मीरा- भाईंदर साठीचा अहवाल अंतिम टप्प्यात असून कोल्हापूर पोलीस आयुक्तालयाबाबत लवकरात लवकर अहवाल मागविण्यात येईल.
या विषयावरील चर्चेला उत्तर देताना गृह राज्यमंत्री दीपक केसरकर म्हणाले की, पोलीस ठाण्याच्या बांधकामासाठी तसेच पोलिसांच्या निवासस्थानासाठी अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद करण्यात आली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणी राहायचे असेल तर त्यासाठी शासनाने नवीन धोरण केले असून त्यानुसार पोलिसांना हक्काची घरे देण्यासाठी बँकेचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच पोलिसांसाठी चांगल्या वसतिगृहाची सोय करण्यात येईल.