Breaking News

कळवण तालुक्यातील रस्त्यांचे ऑडीट करा भाजपाची कुरघोडी निकृष्ट रस्त्यांच्या कामांत राष्ट्रवादीच्या ठेकेदारांचे योगदान

राज्य पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसने राज्य सरकारच्या भाजपेयी कारभाराला हल्लाबोल सुरू केला असला तरी नाशिक जिल्ह्यात हा हल्लाबोल कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोकशाही आघाडी सरकारमध्ये रस्ते आणि तत्सम बांधकामाची कंत्राटे सत्ताधारी पक्षाच्या मंडळींनी लाटली आणि केवळ नफेखोरीचा उद्देश ठेवून कागदोपत्री कामे दाखवून अथवा दुय्यम दर्जाचा कच्चा माल वापरून कामे केल्याने कामांचा दर्जा घसरल्याची टिका सत्ताधारी भाजपा करू लागल्याने हल्लाबोल करणारे राष्ट्रवादी खिंडीत पकडले जात आहेत. कळवण तालुक्यातही हीच परिस्थिती असून कळवण तालुका भाजपेयींनी संधी साधत राष्ट्रवादीचा हल्लाबोल तेवढ्याच प्रखरपणे परतावला आहे.

कळवण सुरगाणा या आदिवासी विधानसभा मतदार संघात गेल्या वीस वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस माकपची आलटूनपालटून सत्ता असतांना कळवण तालुक्याच्या ग्रामीण भागात रस्ते कुणी बांधले?असा सवाल उपस्थीत करून लाखो रुपयाचे नव्हे तर कोट्यावधी रुपयाचे रस्ते बांधणारे ठेकेदार राष्ट्रवादी काँग्रेसचेच पदाधिकारी होते, त्यांच्या काळात निकृष्ट दर्जाचे रस्ते बांधकाम झालेले असल्याने कळवण मतदार संघातील सर्वच सस्त्याचे शासनाचे ऑडीट करावे व रस्त्यावर खड्डेच खड्डे म्हणून बोंबा मारुन सरकारवर हल्लाबोल करणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठेकेदारांची शासनाने चौकशी करावीच अशी मागणी भाजपचे जेष्ठ नेते बाजीराव पवार, तालुका भाजप अध्यक्ष सुधाकर पगार, गोविंद कोठावदे, अशोक मुठे, बोरसे, ठाकरे, गावित, दळवी, चव्हाण आदींनी केली आहे. कळवण मतदार संघात रस्ते घोटाळा, जलयुक्त शिवारघोटाळा, गेल्या कित्येक वर्षापासून सुरु असून, प्रस्थापीत ठेकेदार निकृष्ट दर्जाची बांधकामे सातत्याने करुन कोट्यावधी रुपयांची बिले शासकीय अधिकार्‍यांवर राजकीय दबाव टाकुन सातत्याने वसूल करीत असल्याने ग्रामीण भागातील रस्त्यांची वाट लागली असून, रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले आहेत, त्याला जबाबदार राष्ट्रवादी काँग्रेसच असल्याने नैतीक जबाबदारी स्वीकारुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या जि.प. सदस्यानी राजीनामा देण्याचे धाडस दाखवने गरजेचे असतांना राष्ट्रवादीचा हल्लाबोल मोर्चा निरर्थक असल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला आहे.
कळवण विधानसभा मतदार संघातील सर्वच विकासकामांचे ऑडीट शासनाने त्वरीत करावे, भाजप बरोबर पडद्याआड राष्ट्रवादीचे कोणते ठेकेदार मोजणुक करुन रस्त्याची व जलयुक्त शिवारामधील बंधार्‍यांची कामे कोणी कोणी कुठे घेतली ती किती निकृष्ट दर्जाची झालेली आहेत याची चर्चा संपूर्ण मतदार संघात असून त्या बोगस कामाची पालकमंत्र्यांनी तात्काळ चौकशी करावी, अशी भाजप नेत्यांनी मागणी केली आहे.